कोळपेवाडी वार्ताहर :- माजी आमदार अशोकराव काळे यांनी विरोधी पक्षाचे आमदार असतांना देखील धारणगाव-कुंभारी, चास नळी, कोपरगाव शहरातील बेट भागाला जोडणारा पूल, अहमदनगर-मनमाड महामार्गावरील जुन्या पुलाला समांतर पूल असे गोदावरी नदीवर अनेक ठिकाणी मोठे पूल बांधले. त्याप्रमाणे वारी येथे देखील गोदावरी नदीवर पूल बांधण्याचा त्यांचा मनोदय होता.तो मनोदय पूर्ण करण्यासाठी आ.आशुतोष काळे यांनी हा पूल बांधणार असल्याचा शब्द वारी व परिसरातील पंचक्रोशीतील नागरीकांना दिला होता. दिलेले आश्वासन पूर्ण करण्यासाठी २० कोटी निधी देवून ह्या पुलाचा प्रश्न त्यांनी कायमचा मार्गी लावला आहे. त्यामुळे पूर्व भागातील अनेक गावांचा दळणवळणाचा प्रश्न कायमचा मार्गी लागला असून वारीचा सेतू आ.आशुतोष काळेंच्या विजयाचा मार्ग सुकर करणार असा विश्वास कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती मधुकर टेके यांनी व्यक्त केला.
कोपरगाव मतदार संघातील वारी येथे आ.आशुतोष काळेंच्या प्रचारार्थ नागरिकांशी सभापती मधुकर टेके यांनी संवाद साधला यावेळी ते बोलत होते. टेके पुढे म्हणले की मतदार संघाच्या प्रश्नांची अचूक जाण आणि ते प्रश्न सोडविण्याची हातोटी असलेल्या आ. आशुतोष काळे यांनी पाच वर्षात कोपरगाव मतदार संघाच्या विकासासाठी अजोड योगदान देतांना मतदार संघाचा विकास तर साधलाच आहे. त्याचबरोबर असे काही प्रश्न कायमचे सोडविले आहेत. त्यामुळे मतदार संघातील जनता त्यांच्या कामगिरीवर अतिशय समाधानी आहे.
कोपरगाव मतदार संघाच्या पूर्व भागातील कोपरगाव तालुक्याच्या पूर्व भागातील सावळीविहीर, रुई, वारी-कान्हेगाव, सडे, शिंगवे आदी गावातील नागरिकांना दळणवळणाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा असलेला वारी येथील गोदावरी नदीच्या पुलाचा प्रश्न मागील कित्येक दशकांपासून प्रलंबित होता. हा प्रश्न आ. आशुतोष काळे यांनी सोडविला आहे. आ.आशुतोष काळे यांनी मतदार संघातील प्रत्येक गावाला न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे या गावातील सुज्ञ मतदार निश्चितपणे आ. आशुतोष काळेंच्या पाठीशी राहतील व त्यांच्या विजयाचा मार्ग हा वारीचा सेतू सुकर करणार असल्याचे सभापती मधुकर टेके यांनी सांगितले.