संगमनेर : काँग्रेसचे वरिष्ठ नेते राज्याचे माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या सततच्या पाठपुराव्यातून संगमनेर तालुक्यातील विविध रस्त्यांकरता प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत ३२ कोटी ३६ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती सहकार महर्षीषी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याचे ज्येष्ठ संचालक इंद्रजीत थोरात यांनी दिली.
या बाबत अधिक माहिती देताना इंद्रजीत थोरात म्हणाले की , आमदार बाळासाहेब थोरात यांनी सातत्याने सरकारमधून तालुक्यातील विविध विकास कामांसाठी मोठा निधी मिळवला आहे. या सततच्या विकास कामातून विस्ताराने मोठा असलेला संगमनेर तालुका विकासाचे मॉडेल ठरला आहे. प्रत्येक गावात पायाभूत सुविधा, रस्ते, सिमेंट बंधारे ,शाळा, दवाखाने यांसह विविध वैभवशाली इमारती उभ्या राहिल्या आहेत.
याचबरोबर उत्तर नगरच्या जिल्ह्यासाठी वरदान ठरणारे निळवंडे धरणाचे काम पूर्ण करून कालव्यांच्या कामाला गती दिली. महाविकास आघाडी सरकारच्या काळात रात्रंदिवस हे काम सुरू ठेवून ऑक्टोबर २०२२ मध्येच पाणी देण्याचे उद्दिष्ट ठेवले. मात्र सरकार मध्ये बदल झाला आणि अत्यंत वेगाने सुरू असलेली कामे थंडावली तरीही या कामांचा सातत्याने पाठपुरावा आ. बाळासाहेब थोरात हे करत आहेेत. त्याचाच एक भाग म्हणून पंतप्रधान ग्रामसडक योजनेतून संगमनेर मतदार संघातील विविध रस्त्यांसाठी नव्याने ३२ कोटी ३६ लाख रुपयांचा निधी मिळवला आहे. या अंतर्गत तालुक्यातील उत्तर भागाचा अत्यंत महत्त्वपूर्ण असणारा आशा पीर बाबा- चिंचोली गुरव -नान्नज दुमाला- सोनोशी- बिरेवाडी- मालदाड या २० किलोमीटर गाव रस्त्यासाठी १४ कोटी ४५ लाख रुपये निधी मंजूर झाला आहे.तर संगमनेर नगरपालिका हद्द तिरंगा चौक, घुलेवाडी ते मालदाड या ६ किलोमीटर गाव रस्त्यासाठी ४ कोटी ३७ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. राष्ट्रीय महामार्ग ६० ते गुंजाळवाडी- राजापूर -निमगाव भोजापूर- चिखनी वपेॅ वस्ती या ११ किलोमीटर रस्त्यासाठी ९ कोटी १७ लाख रुपयांचा निधी मिळाला आहे. रणखांबवाडी- दरेवाडी- कवठे मलकापूर या ६ किलोमीटर रस्त्यासाठी ४ कोटी ३७ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असून लवकरच या कामाला सुरुवात होणार असल्याने देवकौठे, चिंचोली गुरव, नान्नज दुमाला, सोनोशी, बिरेवाडी, मालदाड, घुलेवाडी, गुंजाळवाडी ,राजापूर, निमगाव, चिकनी, कवठे मलकापूर, दरेवाडी रणखांब या गावांमधील नागरिकांनी आमदार बाळासाहेब थोरात यांचे अभिनंदन केले आहे.