कोळपेवाडी वार्ताहर :- मागील पाचही वर्ष आ. आशुतोष काळे यांनी स्वखर्चातून उजनी उपसा जलसिंचन योजना यशस्वीपणे सुरु ठेवली आहे. यावर्षी देखील टप्पा एक पूर्ण झाला असून दुसरा टप्पा लगेच सुरु करा आशा सूचना आ. आशुतोष काळे यांनी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
रांजणगांव देशमुख, धोंडेवाडी, वेस, सोयगाव, अंजनापूर, बहादरपूर, मनेगाव ह्या कायम स्वरूपी दुष्काळी गावांची जीवन दायीनी असलेली रांजणगाव देशमुख उजनी उपसा जलसिंचन योजना तिच्या कार्यकाळात २००४ ते २०१४ व २०१९ ते २०२४ या पंधरा वर्षात माजी आमदार अशोकराव काळे व सद्यस्थितीत आ.आशुतोष काळे यांनी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्यासाठी स्वखर्चातून चालविली आहे. या रांजणगाव देशमुख उजनी उपसा जलसिंचन योजनेसाठी ओव्हरफ्लोचे पाणी आरक्षित असून हि योजना सुरु राहिल्यामुळे या योजनेतून पाझर तलाव भरले जात असल्यामुळे पिण्याच्या पाण्याचा व शेती सिंचनाचा प्रश्न बऱ्याच अंशी सुटण्यास मदत होऊन भू-गर्भातील पाणी पातळी देखील वाढण्यास मोठी मदत झाली आहे.त्यामुळे जनावरांच्या व नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत होणार असून टँकर देखील दीर्घकाळ सुरु ठेवण्याची वेळ प्रशासनावर आली नाही त्यामुळे शासनाचा टँकरवर होणारा मोठा आर्थिक खर्च वाचण्यास मोठी मदत झाली आहे.
हि योजना नियमित सुरु ठेवण्यासाठी आ.आशुतोष काळे यांनी पाचही वर्ष खर्च करण्यात हात आखडता घेतला नाही. ज्या ज्यावेळी अडचणी आल्या त्या त्यावेळी पुढे होवून या योजनेला गती दिली आहे. यावर्षी या योजनेचा ट्रान्सफॉर्मर चोरीला गेला त्यावेळी आ. आशुतोष काळे यांनी भाडोत्री ट्रान्सफॉर्मर उपलब्ध करून देवून हि योजना सुरु ठेवली. नुकताच नवीन ट्रान्सफॉर्मर बसवून हि योजना पूर्ण क्षमतेने सुरु झाली असून पहिला टप्पा पूर्ण झाल्यामुळे दुसरा टप्पा देखील सुरु करण्याच्या सूचना त्यांनी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. तसेच ज्या ठिकाणी चाऱ्या बुजलेल्या आहेत त्याठिकाणी पाणी जाण्याकरिता चाऱ्या उकरण्यासाठी जेसीबी उपलब्ध करुन देतो तुम्ही त्या ठिकाणी प्रत्यक्ष उभे राहून चाऱ्या उकरण्याचे काम योग्य पद्धतीने करून घ्या व जवळकेचा साठवण तलाव देखील भरून द्या अशा सूचना आ. आशुतोष काळे यांनी दिल्या आहेत. त्यामुळे रांजणगांव देशमुख, धोंडेवाडी, वेस, सोयगाव, अंजनापूर, बहादरपूर, मनेगाव व परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असून उजनी उपसा जलसिंचन योजनेला जीव लावणाऱ्या आ. आशुतोष काळे यांचे आभार मानले आहे.