लाभधारक शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी
कोळपेवाडी वार्ताहर– गोदावरी कालव्याच्या लाभ क्षेत्रातील शेती व शेतकऱ्यांचे भवितव्य अवलंबून असलेल्या लाभधारक शेतकऱ्यांसाठी उद्या शुक्रवार (दि.०९) पासून डाव्या उजव्या कालव्याला चौथे आवर्तन सोडण्यात येणार आहे अशी माहिती आ. आशुतोष काळे यांनी दिली आहे
मागील वर्षी धरण क्षेत्रात समाधानकारक पर्जन्यमान झाल्यामुळे सर्व धरणे पूर्ण क्षमतेने भरलेली होती. लाभक्षेत्रात देखील चांगला पाऊस पडला होता.त्यामुळे यापूर्वी लाभधारक शेतकऱ्यांना पूर्ण क्षमतेने तिनही आवर्तनाचा लाभ मिळालेला आहे. परंतु मागील काही दिवसांपासून उन्हाची तीव्रता मोठ्या प्रमाणात वाढली असून भूगर्भातील पाणी पातळी देखील खालावली आहे. पावसाचे आगमन कधी होईल याचा अंदाज येत नसल्यामुळे गाव तळ्यावर अवलंबून असणाऱ्या पाणी पुरवठा योजना, शेतात उभी असलेली चारा पिके, फळबागा व बारमाही पिकांसाठी या चौथ्या आवर्तनाचा लाभ होणार असून भूगर्भातील पाणी पातळी देखील वाढण्यास काही अंशी मदत होणार आहे.
चौकट :- दरवर्षी जूनच्या पहिल्या आठवड्यात पावसाचे बहुतांशी आगमन होत असते मात्र यावर्षी बिपोरजॉय चक्रीवादळाचा परिणामामुळे अजूनही पाऊस केरळात दाखल झालेला नाही. वेधशाळेच्या अंदाजानुसार पुढील आठवड्यात पावसाचे आगमन होईल असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मनात चिंतेच्या ढगांनी गर्दी केली आहे. शेतकऱ्यांनी मिळणाऱ्या या आवर्तनातून चारा पिके, फळबागा व बारमाही पिकांना पाणी द्यावे जेणेकरून पाऊस जरी काही दिवस लांबला तरी त्याचा परिणाम पिकांवर होणार नाही.तसेच पाणी पुरवठा करणाऱ्या योजनांची गावतळी, पाझर तलाव भरून घ्यावेत. पाऊस लांबल्यामुळे होणारे संभाव्य नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी या आवर्तनाचा गांभीर्याने विचार करून योग्य नियोजन करून गोदावरी कालव्याच्या लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांनी या चौथ्या आवर्तनाचा लाभ घ्यावा जेणेकरून येणारे संकट टळू शकेल – आ. आशुतोष काळे