उमेदवारीच्या चर्चेच्या राजकारणात कोल्हे यांची सरशी ?

0

कोल्हेंची विधानसभा मैदानातून माघार ? ये बात कुछ हजम नही हुई !

कोपरगाव प्रतिनिधी  : सध्या राज्याच्या राजकारणात विधानसभा निवडणूकीच्या रणधुमाळीमुळे सर्वत्र राजकीय वातावरण ढवळून निघत असताना कोपरगावचे राजकारण भाजपामध्ये असलेले कोल्हे कुटुंबीय विधानसभेची उमेदवारी करणार की नाही या चर्चेवर येऊन थांबले आहे. त्यामुळे संपूर्ण तालुक्यातच नव्हे राज्यात तर काळे विरुद्ध कोल्हे ही लढत होईल की नाही,  मतदारसंघांमध्ये कोण निवडून येणार यापेक्षा कोल्हे उमेदवारी करणार की नाही हीच चर्चा चालू आहे. त्यामुळे कोल्हे-काळेच्या राजकीय लढाईपेक्षा सध्या तरी कोल्हेंच्या उमेदवारीच्या राजकीय चर्चेनेच बाजी मारल्याचे दिसून येत आहे.

 कोपरगाव विधानसभा मतदारसंघांमध्ये काळे विरुद्ध कोल्हे ही पारंपारिक लढत होणार अशीच अटकळ मतदारसंघातील नागरिकांनी बांधलेली होती. अडीच वर्षांपूर्वी राज्यात झालेल्या राजकीय घडामोडीमुळे भाजप,अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना एकनाथ शिंदे गट असा महायुतीचा प्रयोग झाल्याने कोपरगाव विधानसभा मतदार संघामध्ये एकमेका विरुद्ध उभे ठाकणारे कोल्हे आणि काळे यांना अनिच्छेने की होत नाही एकत्र यावे लागले. यामध्ये  राष्ट्रवादीचे आशुतोष काळे हे विद्यमान आमदार असल्याकारणाने त्यांची उमेदवारी जवळपास नक्की ठरलेली होती. या सर्व घडामोडीमुळे कोल्हेंना यावेळेस भाजपकडून उमेदवारी मिळण्यार नसल्याचे गृहीत मानण्यात आले होते . त्यामुळे माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांचे चिरंजीव युवा नेते विवेक कोल्हे हे आपली वेगळी वाट धरण्याची दाट शक्यता व्यक्त होत असतानाच कोल्हे विधानसभेच्या निवडणुकीतून थांबणार असल्याची चर्चा गेल्या दोन तीन दिवसांपासून होऊ लागल्याने एकच राजकीय खळबळ उडाली आहे. कोल्हे-काळे यांचे राजकीय वैर सर्वश्रुत आहे. त्यामुळे विधानसभेच्या मैदानात काळे प्रतिस्पर्धी असताना कोल्हे आपले शस्त्र म्यान करणार असल्याच्या चर्चेवर राजकीय विश्लेषकच काय तर सर्वसामान्य जनतेला ही विश्वास ठेवणे अशक्य मानले जात आहे. त्यामुळे ही केवळ चर्चा आहे की एक ठरवून तयार केलेली व्यूहनिती असावी असे राजकीय अभ्यासकांचे मत आहे.

 राज्यातील महायुतीच्या प्रयोगाने आधी सत्तेत विरोधी असणारे दोन्ही घराणे महायुतीचे घटक बनले होते . असे असतानाही विवेक कोल्हे यांनी आपली राजकीय वाटचाल विरोधकाच्या भूमिकेतच सुरु ठेवली होती. यामध्ये त्यांनी आमदार आशुतोष काळे यांच्या विरोधात आपले मत मांडत आले होते . एकीकडे आशुतोष काळे मतदारसंघात आपल्या विधानसभेच्या निवडणुकीची तयारी करताना 3000 कोटीच्या विकास कामांचा लेखाजोखा मांडत होते तर विवेक कोल्हे त्या विकास कामातील फोलपणा जनतेसमोर मांडत होते. हे राजकीय द्वंद्व एवढ्यावरच न थांबता विवेक कोल्हे हे शेजारील मतदारसंघातील आणि राज्यातील मातब्बर नेते विखे पाटलांनाही आपल्या विरोधाची धार दाखवून देत होते. शिवाय महायुतीच्या राजकारणाला छेद देत गणेशच्या निवडणुकीत विखेंचे पारंपारिक विरोधक बाळासाहेब थोरात यांच्याशी संधान साधत जिल्ह्यात वेगळ्याच राजकारणाची सुरुवात केली होती. ज्या विखेंना भलेभले विरोधक विरोध करताना विचार करीत होते. त्या विखे पॅटर्नला ठामपणे विरोध केल्याने जिल्ह्यातील उभरते युवा नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात आहे. या राजकीय भूमिकेमुळे कोल्हेना याचा त्रासही सहन करावा लागला. यामध्ये जिल्हा बँकेचे कर्ज थांबवणे किंवा कोल्हे कारखान्याची केलेली चौकशी याचाही यात समावेश होता.

 या घडामोडी शिवाय विवेक कोल्हे यांनी मागील काही दिवसांपूर्वी खासदार शरद पवार यांची घेतलेली भेट, निव्वळ भेटच नव्हे तर त्यांच्या गाडीतून केलेला प्रवास यामुळे विवेक कोल्हे लवकरच वेगळा राजकीय निर्णय घेणार असा अंदाज बांधला जात होता . शिवाय कोल्हे कारखान्याच्या बॉयलर प्रदीपन कार्यक्रमांमध्ये ही आपण आपला निर्णय लवकरच जाहीर करू असे त्यांनी कार्यकर्त्यांना सांगितले होते. त्यामुळे ते लवकरच पक्षांतर करतील असाच अंदाज व्यक्त होत होता. याच दरम्यान माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीचा तपशील जरी जाहीर रित्या बाहेर आला नसला तरी कोल्हेंनी विधान सभेच्या मैदानात थांबून घेतल्यास त्यांचे योग्य पुनर्वसन करण्याचा शब्द दिला असल्याची चर्चा बाहेर आली किंवा आणल्या गेली.   या चर्चेमुळे मतदारसंघातील शांत असलेले राजकीय वातावरण अचानक ढवळून निघालेले आहे.  या परंतु या दरम्यान गेल्या काही दिवसांपासून आमदार अशुतोष काळे यांनी केलेल्या विकास कामांच्या प्रचाराच्या चर्चा मागे पडून मतदारसंघात कोल्हेंच्या उमेदवारीचीच चर्चा अधिक होऊ लागली आहे. म्हणूनच चर्चेत राहण्यासाठी कोल्हेंनी घडून आणलेली राजकीय खेळी तर नसावी ना या शंकेस वाव मिळत आहे . असे असेल तर या राजकीय चालीने कोल्हे आपल्या राजकीय विरोधकांना शह देण्यात यशस्वी ठरले आहे असे म्हणावे लागेल. शिवाय कोल्हेंच्या या राजकीय चालीकडे शांतपणे पाहण्याशिवाय  काळेयांच्याकडे दुसरा पर्यायही दिसून येत नाही.

 या सर्व घडामोडीबाबत कोल्हे यांच्या निकटवर्तीयांकडे संपर्क साधला असता सध्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे या गृहमंत्री अमित शहा यांच्या भेटीसाठी दिल्लीकडे रवाना झाल्याअसल्याचे सांगण्यात आले आहे. या भेटी दरम्यान त्यांना काही ठोस आश्वासन मिळण्याचे संकेत मिळाले असून तेथून परतल्यानंतरच कोल्हे आपली राजकीय भूमिका जाहीर करणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here