अधिकाऱ्यांच्या कार्यकाळात केलेल्या कामांचा लेखाजोखा वाचा सविस्तर; आमदार रोहित पवार यांनी केला कारवाईचा निषेध
जामखेड तालुका प्रतिनिधी – सत्ताधारी आमदारांच्या दबावात राज्य सरकारमार्फत कर्जत उपविभागाचे उपविभागीय अधिकारी डॉ. अजित थोरबोले व कर्जतचे तहसीलदार नानासाहेब आगळे यांचे नुकतेच निलंबन करण्यात आले तर जामखेड नगर परिषदेचे मुख्याधिकारी मिनिनाथ दंडवते आणि कर्जत नगर पंचायतचे मुख्याधिकारी गोविंद जाधव यांची नुकतीच बदली करण्यात आली आहे. परंतु, गेल्या काही वर्षांपासून उल्लेखनीय कामगिरी करत कर्जत-जामखेडचे नाव राज्य पातळीवर उंचावण्यासाठी प्रयत्न करत असलेल्या अशा कार्यतत्पर अधिकाऱ्यांवर झालेली कारवाई ही अन्यायकारक असून यामुळे अधिकाऱ्यांचे मनोबल खचण्याची आणि त्याचा लोकांना सेवा देण्याच्या कामांवर विपरीत परिणाम होण्याची भीती निर्माण झाली आहे.
दरम्यान, कर्जत व जामखेड तालुक्यात मिशन वात्सल्य मोहीम, विशेष सहाय्य योजना लाभार्थी शोध मोहीम, पालक मंत्री शेत पाणंद रस्ते अशा विविध कामांमध्ये महत्वाची भूमिका बजावत या अधिकाऱ्यांनी लाभार्थ्यांचा एक नवा विक्रम प्रस्थापित केला करत उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. तसेच कर्जत व जामखेड दोन्ही तालुक्यात गतवर्षी आणि या वर्षी मिळून एकत्रित ३३ हजारांहून अधिक इष्टांक संपवला आहे आणि पात्र लाभार्थ्यांना शिधापत्रिका मिळवून दिल्या आहेत. तसेच यंदा एकाच वेळी २० हजारांच्या आसपास नागरिकांना शिधापत्रिका वाटप करण्याचा उपक्रम काही महिन्यांपूर्वीच कर्जत-जामखेड मतदारसंघात या अधिकाऱ्यांच्या मदतीने राबवण्यात आला होता.
याशिवाय या अधिकाऱ्यांच्या कार्यकाळात कर्जत व जामखेडमध्ये विशेष सहाय्य योजना लाभार्थी शोधमोहीम राबवून अवघ्या एक महिन्याच्या आत पाच हजारांहून अधिक लाभार्थ्यांना विविध निवृत्ती वेतन योजना मंजूर करण्यात आली. सोबतच मिशन वात्सल्यमधील संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ योजना, राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजना, राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजना या योजनांच्या हजारो लाभार्थ्यांना लाभ मिळाला आहे व पालकमंत्री शेत पानंद रस्ते योजनेअंतर्गत रस्त्यांची कामे देखील पूर्ण झाली आहेत. या सोबतच कोरोना महामारी असताना या अधिकाऱ्यांनी सामाजिक भान ठेवून केलेली कामे देखील विसरून चालणार नाहीत.
डॉ. अजित थोरबोले यांनी कर्जत उपविभागाला पुढे नेण्यासाठी आणि अग्रेसर ठेवण्यासाठी कायमच प्रयत्न केले आणि तहसीलदार नानासाहेब आगळे यांनी देखील कर्जत तालुक्यात विविध योजनांचा लाभ प्रत्येक नागरिकाला मिळावा यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न केले व कर्जत येथील मुख्याधिकारी गोविंद जाधव यांनी नगर पंचायतचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर नेले व जामखेड येथील बदली करण्यात आलेले मुख्याधिकारी मिनिनाथ दंडवते यांनी नुकताच घरकुल योजनेत एक नवा विक्रम प्रस्थापित करत संपूर्ण जिल्ह्यात अव्वल स्थान प्राप्त केले होते. या अधिकाऱ्यांनी लोकप्रतिनिधींसोबत समन्वय साधून सातत्याने मतदारसंघाला पुढे नेण्यासाठी प्रयत्न केले. परंतु राजकीय फायद्यासाठी कार्यक्षम अधिकाऱ्यांवर केलेली कारवाई कितपत योग्य आहे असा सवाल आता जनसामान्यांमधून विचारला जात आहे. जर अशीच राजकीय आकसापोटी कारवाई करून काम करणाऱ्या अधिकाऱ्यांवर अन्याय केला जाणार असेल तर कर्जत-जामखेडला कोणी अधिकारी येण्यास देखील तयार होणार नाही व परिणामी पुन्हा पूर्वीचे दिवस परत येतील, अशी भीती स्थानिकांना वाटत आहे.
हे सर्व राजकीय दृष्टिकोनातून केले जात आहे. विधान परिषदेमध्ये मतदारसंघातील नागरिकांच्या हिताचा एकही प्रश्न माजी मंत्री राम शिंदे यांनी मांडला नाही. त्यांनी फक्त राजकीय द्वेशातून अधिकाऱ्यांवर कारवाई करा आणि कामे थांबवा याशिवाय दुसरं काहीही केलेलं नाही. अन्यायकारक कारवाई केलेल्या अशा चांगल्या अधिकाऱ्यांच्या बरोबर कर्जत जामखेड मधील जनता, पदाधिकारी आम्ही सर्व जण उभे आहोत व झालेल्या कारवाईचा मी जाहीर निषेध व्यक्त करतो.
रोहित पवार – आमदार कर्जत-जामखेड