कोपरगाव प्रतिनिधी : सध्या महाराष्ट्र मध्ये निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. कोपरगावातही निवडणुकीची हवा आहे. गावागावातील कार्यकर्ते आपापल्या उमेदवाराच्या प्रचारासाठी जीवाचे रान करत आहे. मात्र शेतकरी आपल्या रानात उसाची लागवड करताना व्यस्त आहे. कोपरगाव तालुक्यातील सोनेवाडी येथे नगदवाडी आनंदवाडी रोड लगत पुरुषोत्तम प्रभाकर जावळे यांच्या अडीच एकर शेतामध्ये काल 265 जातीच्या उसाची लागवड करताना शेतकरी व्यस्त होते.
आप्पासाहेब जावळे, गोवर्धन जावळे व पुरुषोत्तम जावळे यांनी उसाचे बेणे मजुरांकडून तयार करून घेत शेतात लागवड केली. कर्मवीर शंकरराव काळे कारखान्याला या ऊसक्षेत्राचे नोंद केली असल्याचे पुरुषोत्तम जावळे यांनी सांगितले. निवडणुकीच्या काळामध्ये मजुर मिळणे कठीण असते. अशा परिस्थितीतही आपल्या शेतीवर प्रेम करणारे शेतकरी अजून तत्पर असतात. निवडणूक दर पाच वर्षांनी येणार असते. सरकार कोणाचेही येऊ मात्र शेतकऱ्यांच्या शेतीमालाला, दूधाला चांगल्या प्रकारचा भाव जर मिळाला तर शेतकरी समाधानी होत असतो असे आप्पासाहेब जावळे यांनी सांगितले.