सावेडी ज्येष्ठ नागरिक मंचच्यावतीने ‘गाथा स्वातंत्र्याची कथा अ.नगरची’ संपन्न
अहमदनगर :- क्षेत्रफळाचा व आकारमानाच्या दृष्टीने अहमदनगर जिल्हा जरी मोठा असला तरी त्याचे मोठेपण आकारमानात नसून त्याच्या इतिहासात आहे. देव, दानवांपासून तर अगदी रामायण, महाभारताच्या नोंदी आपल्याला जिल्ह्यात पहावयास मिळतात, असे उद्गार पत्रकार भूषण देशमुख यांनी केले.
सावेडी ज्येष्ठ नागरिक मंचच्यावतीने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त आयोजित ज्येष्ठ पत्रकार भुषण देशमुख यांचा ‘गाथा स्वातंत्र्याची कथा अहमदनगरची’ हा उपक्रम संपन्न झाला.
पुढे बोलतांना पत्रकार भुषण देशमुख यांनी अहमदनगरचे ऐतिहासिक महत्व स्लाईड शोद्वारे सादर केले. नगरचे भौगोलिक व ऐतिहासिक वैशिष्ट्ये सांगतांनाच त्याचे स्वातंत्र्य लढ्यातील महत्व तसेच नगरचे सुपूत्र देशभक्त रावसाहेब पटवर्धन, दादा चौधरी यांचे स्वातंत्र्य चळवळीतील योगदाना विषयी माहिती दिली. त्याचप्रमाणे स्वातंत्र्यवीर सावरकर, साने गुरुजी, बाळासाहेब देशपांडे, पंडित नेहरु, लोकमान्य टिळक आदिंनी नगर मध्ये दिलेल्या भेटीचा व कार्याचा उल्लेख केला. त्याचप्रमाणे पंडित जवाहरलाल नेहरु यांनी नगरच्या किल्ल्यात कैदेत असतांना त्यांनी लिहिलेल्या ‘डिस्कव्हरी ऑफ इंडिया’ची पार्श्वभुमी सादर केली. यावेळी नगर जिल्ह्याचा गेल्या पाच शतकांचा इतिहास त्यांनी यावेळी उलगडून सांगितला. स्थापने पासून म्हणजे 1490 पासून ते 1947 पर्यंतच्या भारताच्या स्वातंत्र्यपर्यंतचा इतिहास स्लाईड शो द्वारे प्रस्तुत केला.
यावेळी मंचचे अध्यक्ष आदिनाथ जोशी, मोरेश्वर मुळे, शरद कुलकर्णी, माधवी कुलकर्णी, स्नेहल वेलणकर, आनंद कुलकर्णी, श्री.खणकर, बाजीराव जाधव, पुष्पा चितांबर, सर्वोत्तम क्षीरसागर बलभिम पांडव, शिवप्रसाद जोशी आदि उपस्थित होते.
यावेळी भुषण देशमुख यांनी उपस्थित ज्येष्ठ नागरिकांना इतिहासावर प्रश्न विचारुन योग्य उत्तर देणार्यांना बक्षिसे देण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्तविकात मंचचे अध्यक्ष आदिनाथ जोशी यांनी मंचच्यावतीने राबविण्यात येणार्या उपक्रमांची माहिती दिली. सूत्रसंचालन व परिचय पी.एन.डफळ यांनी करुन दिला तर शेवटी ज्योती केसकर यांनी आभार मानले.