देवळाली प्रवरा / प्रतिनिधी
देवळाली प्रवरा येथिल शेतकरी संघटनेच्या वतीने शेतकऱ्यांचा सात बारा उतारा कर्जातून मुक्त करावा या मागणीसाठी 10 सष्टेबर रोजी सकाळी 11 वा राहुरी तहसिल कार्यालयावर कर्जमुक्ती मोर्चा आयोजित करण्यात आला आहे.कर्जमुक्तीचा पहिला मोर्चा राहुरीत होणार आहे.त्याचा वनवा माञ महाराष्ट्रभर पोहचणार आहे.सरकारला शेतकऱ्यांचा सातबारा उतारा कर्जमुक्त करावाच लागणार असल्याची माहिती शेतकरी संघटनेचे माजी जिल्हाध्यक्ष राजेंद्र लोंढे यांनी दिली आहे.
देवळाली प्रवरा येथिल जुने हनुमान मंदिरात कर्जमुक्ती आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी शेतकऱ्यांची बैठक आयोजित केली होती.या बैठकीच्या अध्यक्षस्थानी ह.भ.प.गोरक्षनाथ चव्हाण हे होते. यावेळी परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी कृष्णा मुसमाडे यांनी शेतकऱ्यांच्या व्यथा मांडताना सांगितले की, केंद्र सरकारने कांद्यावर 40 टक्के निर्यात शुल्क आकारल्यामुळे कांद्याचे भाव पडले.शेतकऱ्यांनी लोकसभा निवडणूकीत सरकारला त्यांची जागा दाखविली आहे.शेतकऱ्यांनी एकजुट केली तर सरकार हि नरमेल.शेती मालास भाव मिळत नसल्यामुळे शेतकरी कर्ज बाजारी होत आहे.
यावेळी सतिष वाळुंज यांनी आपली भुमिका मांडताना सांगितले की,नोकदारास 8 ते 9 टक्के घर बांधणीसाठी कर्ज मिळते.परंतू शेतकऱ्यांना माञ घर बांधणीसाठी कर्ज मागितले तर बँका दारात उभे करीत नाही.शेतकरी चांगल्या घरात राहिला नाही पाहिजे हिच तर सरकारची इच्छा आहे. कर्जमुक्ती योजना आंदोलनाची पहिली ठिणगी देवळाली प्रवरात पडली आहे.त्याचे लोण महाराष्ट्रभर पोहचले पाहिजे.कांद्याचे भाव पाडले म्हणून काँग्रेसचा पराभव झाला आहे.सत्ताधारी सरकारलाही धडा शिकविणे गरजेचे आहे.शेतकरी एकजुट झाला तरच सुजलाम सुफलाम होईल.असे वाळुंज यांनी सांगितले.
अमोल मुसमाडे म्हणाले की, आंदोलन केले की, गुन्हे दाखल होतात.या आंदोलन असे करायचे शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल होणार नाही.सरकारचे नाक दाबल्या शिवाय तोंड उघडणार नाही.
अँड प्रशांत मुसमाडे म्हणाले की, शेतकरी राजा आहे.असे फक्त म्हटले जाते.शेती पिकातून मिळणारे उत्पन्न मिळणारा भाव याचा समतोल नसल्याने शेतकरी राजा आता भिकारी झाला आहे. भिकारी झालेला शेतकरी राजा जगाचा पोशिंदा असुन जगात करोडो लोकसंख्या असली तरी शेतकऱ्यांने पिकविलेल्या अन्न धान्यावर तो जग जगत आहे. शेतकऱ्यांना रासयनिक खत, औषधे, शेती अवजारे,शेती संबधी कोणत्याही वस्तू विकत घेतल्या तर त्यावर जीएसटी लावला जातो.कर्जमुक्ती आंदोलनात कोणात्याही शेतकऱ्यांवर गुन्हा दाखल झाला तर त्या शेतकऱ्यांच्या विना मोबदला गुन्हे लढविले जातील.असे अँड मुसमाडे यांनी सांगितले.
शेतकरी संघटनेचे शेतकरी संघटनेचे माजी जिल्हाध्यक्ष राजेंद्र लोंढे म्हणाले की,केंद्र सरकारने मोठ्या प्रमाणात खाद्यतेल आयात केले असल्याने सोयाबिनला भाव मिळणार नाही.कांद्याला भाव मिळत नाही.जगाचा पोशिंदा असला तरी त्या शेत मालाला भाव मिळत नाही.शेती मालाचे भाव व्यापारी वर्ग ठरवतो. व्यापाऱ्यांच्या मालाचा भाव माञ शेतकऱ्यांला ठरविता येत नाही.शेती मालाला भाव मिळत नसल्याने शेतकरी कर्ज बाजारी होत चालला आहे.कर्जमुक्तीचा पहिला मोर्चा राहुरीतून काढला जाणार आहे.हे आंदोलन महाराष्ट्रभर पोहचेल. कर्जमुक्तीची देवळाली प्रवरातील पहिली ठिणगी महाराष्ट्रात पोहचेल.याठिणगीचा वनवा झाल्या शिवाय राहणार नाही असे लोंढे यांनी सांगितले.
बैठकीच्या अध्यक्षस्थावरुन बोलताना ह.भ.प.गोरक्षनाथ चव्हाण म्हणाले की, शेतकरी संघटीत होत नसल्याची भावना सरकारची असल्याने शेतकऱ्यांकडे सरकार दुर्लक्ष करते. शेतकरी संघटीत झाला तर सरकारची झोप उडवू शकते.लोकसभा निवडणूकीत शेतकऱ्यांची ताकत काय असते हे दाखवून दिले आहे.सरकारने शेतकऱ्यांचा अंत न पाहता शेतकऱ्यांचा सात बारा उतारा कर्जातून मुक्त करावा असे चव्हाण यांनी सांगितले.
यावेळी नानासाहेब कदम यांच्या उपस्थित शेतकऱ्यांनी सरकार विरोधात आपल्या भावना व्यक्त करतानी शेतकरी कर्जमुक्त झाला पाहिजे अशी मागणी केली.
या बैठकीसाठी अँड संभाजीराव कदम,सुखदेव मुसमाडे, बाळासाहेब खुरुद, केदारनाथ चव्हाण,देवराम कडू, दिपक पठारे,रामनाथ उऱ्हे,प्रकाश कदम, सोपान उंडे,कृष्णा खांदे,प्रकाश ठोंबरे, बाबासाहेब उऱ्हे,ज्ञानेश्वर उऱ्हे,रविंद्र उऱ्हे, अर्जुन येवले, सुधाकर ढुस,यशवंत देठे, संजय कदम, गंगाराम मुसमाडे,दत्तु दळवी, बाबासाहेब संसारे, राजेंद्र सौदागर, दत्ताञय पुजारी, उद्धव उऱ्हे, नामदेव चव्हाण,भागवत पठारे, अशोक मुसमाडे आदी उपस्थित होते.
चौकट
गरीब कसे व्हायचे?
कर्जमुक्ती आंदोलनाची दिशा ठरविण्या संदर्भातील बैठकीचे अध्यक्ष ह.भ.प.गोरक्षनाथ चव्हाण यांनी सांगितले की, अनेक कार्यक्रमात प्रश्न विचरणारे भेटतात.असाच एकजणाने मला प्रश्न केला की, तुम्ही सर्वांना श्रीमंत होण्याचे सल्ले देतात.मग गरीब कसे व्हायचे या बद्दल काय सल्ला द्याल.शेती विकत घ्या ती शेती पिकवा.उत्पादित झालेला माल बाजारपेठेतील व्यापाऱ्यास विका पिकविण्यासाठी आलेला खर्च उत्पादीत मिळतो का पहा? शेती पिकवायला लागले की आपोआप गरीब होत जातो.गरीब होण्यासाठी फक्त शेती पिकवा म्हणजे गरीब होण्यास वेळ लागत नाही.