कोळपेवाडी वार्ताहर – कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या सभासद व ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी कारखान्याचे मार्गदर्शक व ज्येष्ठ संचालक मा.आ.अशोकराव काळे व कारखान्याचे चेअरमन आ. आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली कारखाना कार्यक्षेत्रातील कोपरगाव तालुक्यातील संवत्सर व सिन्नर तालुक्यातील पाथरे येथे ऊस पिक परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते.अध्यक्षपदी कारखान्याचे व्हा.चेअरमन शंकरराव चव्हाण होते.
याप्रसंगी महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे वरिष्ठ मृदशास्त्रज्ञ डॉ.अनिल दुरगुडे व जैन इरिगेशनचे प्रमुख कृषी शास्त्रज्ञ सुरेश मगदूम यांनी शेतकऱ्यांना ऊस पिकाच्या पाणी व खत व्यवस्थापनाबद्दल माहिती देवून मार्गदर्शन केले. यावेळी डॉ.अनिल दुरगुडे यांनी सांगितले की, ऊस पिकाची लागवड करताना शेतकऱ्यांनी योग्य जमिनीची निवड करावी. ऊस लागवड करण्याआधी जमिनीची सुपीकता राखणे गरजेचे आहे. शेतात दोन वर्षातून एकदा तरी हिरवळी पिकाची लागवड करावी, ऊस लागवड करण्याआधी हिरवळीचे पिके घेतल्यास जमीन सुपीक बनते यामुळे जमिनीचा पोत सुधारण्यास मदत होते. ऊस लागवडीनंतर उसाची भरघोस वाढ होवून उसाचे उत्पादन वाढण्यास मदत होत असल्याचे त्यांनी सांगितले. उसाच्या पाण्याच्या सिंचनासाठी ठिबक सिचनचा वापर करावा. जमीन सुधारणा व्यवस्थापन कडे माती परीक्षणानुसार प्राधान्य द्यावे. जमिनीमध्ये मळी, जिप्सम, आदी खतांचा वापर करावा. क्षारयुक्त जमिनीमध्ये निचऱ्याचे व्यवस्थापन करून क्षाराचा निचरा सामूहिक पद्धतीने करावा. जास्तीत जास्त जैविक व सेंद्रिय घटकांचा ऊसासाठी वापर करून ऊसाच्या दर्जेदार आणि चांगल्या वाढीसाठी तसेच गुणवत्तेसाठी सूक्ष्म ग्रेड टू चा फवारणी द्वारे व ठिबक द्वारे वापर करावा. जमिनीत वापसा ठेवावा पाणी व खतांची बचत करण्यासाठी आधुनिक सिंचन पद्धतीचा वापर करून ऊस पिकांचे शाश्वत उत्पादन घेण्यासाठी त्यांनी सखोल मार्गदर्शन केले.
या ऊस पिक परिसंवादासाठी कारखान्याचे संचालक सुधाकर रोहोम, राजेंद्र घुमरे, दिलीपराव बोरनारे, वसंतराव आभाळे,अॅड.राहुल रोहमारे,प्रवीण शिंदे, प्रशांत घुले, गंगाधर औताडे, सुरेश जाधव, शेतकी अधिकारी निळकंठ शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कारखान्याचे प्र.कार्यकारी संचालक सुनील कोल्हे यांनी केले. सूत्रसंचालन व आभार अण्णासाहेब चीने यांनी आभार मानले.यावेळी मोठ्या संख्येने सभासद व ऊस शेतकरी उपस्थित होते. ऊस पिक परिसंवाद कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी- कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या ऊस विकास व शेतकी विभागातील अधिकारी व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.