अकोले प्रतिनिधी- काँग्रेस पक्षाला त्याग , बलिदान तसेच काळाची गरज लक्षात घेत नवनवीन आव्हाने पेलण्याची शक्ती , देशप्रेम आणि बंधुत्वाची भावना जपत सर्वांना सोबत घेत कल्याणकारी योजना राबविण्याचे कसब असल्याने काँग्रेसचे विचारच आपल्याला सशक्त बनविणार असल्याचे प्रतिपादन भारतीय काँग्रेस पक्षाच्या कार्यकारिणी सदस्या तथा राजस्थानच्या आमदार रिता चौधरी यांनी केले.
विधानसभा निवडणूकीच्या निमित्ताने पक्षाच्या निरीक्षक म्हणून त्यांच्या प्रमुख उपस्थितीत पक्षाच्या विविध विभागाच्या कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली त्या प्रसंगी त्या बोलत होत्या. राहुल गांधी यांनी सातत्याने पक्षाची ध्येय धोरणे मांडली असून केवळ रामाच्या नावावर राजकारण करण्याचे दिवस आता संपले असून सर्वसामान्य लोकांना आता काँग्रेस पक्ष अधिक जवळ वाटू लागल्याने आपण ही पक्षाचे विचार तळागाळात पोहोचवावेत असे स्पष्ट केले.माजी मंत्री बाळासाहेब थोरात अतिशय उत्तम काम महाराष्ट्रात करत असल्याची भावना व्यक्त करत महाविकास आघाडीच्या बळकटीसाठी बूथ लेव्हल पर्यंत जागृत राहण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
महाराष्ट्रात महात्मा फुले , छत्रपती शिवाजी महाराज, व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार महायुती सरकार व केंद्र सरकार पायदळी तुडवीत असल्याची खंत त्यांनी बोलून दाखविली. शिर्डीच्या साईबाबांच्या पावन भूमीत येण्याचे भाग्य लाभले असल्याची भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली. तर जिल्हा बँकेचे संचालक तथा अभिनव शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मधुकर नवले यांनी आ. रिता चौधरी यांचे स्वागत करत तब्बल तीन वेळा राजस्थानच्या मांडवा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत असल्याचे सांगत माजी केंद्रीय मंत्री व तब्बल सात वेळा आमदार राहिलेले त्यांचे वडील हे काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत नेते होते ही बाब सांगत काँग्रेस पक्षात निष्ठा ,विचार यांना कमालीचे महत्व असल्याचे सांगितले.अकोले तालुक्याने लोकसभेला अधिक मताधिक्य दिले असल्याने यावेळी विधानसभा निवडणुकी साठी सतीश दादा भांगरे यांना संधी मिळावी अशी मागणी तालुका काँग्रेसच्या वतीने केली.
महायुतीचा धर्म यापूर्वीही काँग्रेस पक्षाने पाळला असून यापुढेही तो आपण पाळणार असल्याचे जाहीरपणे सांगितले.यावेळी विधानसभा निवडणुकीचे दावेदार सतीश दादा भांगरे , जिल्हा अध्यक्ष जयंत वाघ आदींनी आपले मनोगत व्यक्त केले.यावेळी जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष संपत म्हस्के , हासे साहेब, बनसोडे साहेब, मधुकर नवले, सोन्याबापू वाकचौरे, दादापाटील वाकचौरे ,अमोल नाईकवाडी,तालुका महिला अध्यक्ष निर्गुडे , मंदाताई नवले, विक्रम नवले, भास्कर दराडे , साईनाथ नवले , सतीश पाचपुते यांचेसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा बाळासाहेब शेटे यांनी तर सूत्रसंचालन रमेश जगताप यांनी केले.