संगमनेर : चंद्रकांत शिंदे पाटील
नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे यांनी १० फेब्रुवारी रोजी ठाण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना एक पत्र लिहिले होते, हे पत्र मुख्यमंत्र्यांना मिळाल्यावर या पत्राची मुख्यमंत्र्यांनी तात्काळ दखल घेत अंमलबजावणी केल्याने आमदार सत्यजित तांबे यांनी ट्विट करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कामाचा माणूस म्हणून कौतुक केले आहे.
एका वृत्तवाहिनीने ९ फेब्रुवारी रोजी ठाणे जिल्ह्यातील तानसा पाणलोट क्षेत्रातून तराफ्यावर शिक्षण व आरोग्यासाठी जीवघेणा प्रवास करणाऱ्या आदिवासी कुटुंबाची बातमी दाखवली होती. या बातमीची दखल आमदार सत्यजित तांबे यांनी घेतली आणि त्यांनी लगेचच १० फेब्रुवारी रोजी ठाण्याचे जिल्हाधिकारी यांना पत्र लिहीत शहापूर तालुक्यातील तानसा धरण पाणलोट क्षेत्राच्या आसपासच्या सात आदिवासी पाड्या मधील २०० कुटुंबांना हॉस्पिटल, शाळा व इतर सुविधांसाठी अत्यंत जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. येथील लोक असुरक्षित अशा प्लास्टिकच्या पाईपच्या तराफ्यातून जीव मुठीत धरून प्रवास करत आहेत. पर्यायी मार्ग नसल्यामुळे सावरदेव जिल्हा परिषद शाळेत शिकणाऱ्या अनेक विद्यार्थी व पालकांना रोज हा संघर्ष करावा लागण हे अत्यंत दुर्दैवी आहे. यासाठी तराफ्यातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी तातडीने सुरक्षा किटची व्यवस्था करावी तसेच त्यांना सुरक्षित वाहतुकीचा पर्याय मिळवून देण्यासाठी लवकरात लवकर कार्यवाही करावी अशी मागणी पत्रातून केली होती. मुख्यमंत्र्यांनी तात्काळ आमदार सत्यजित तांबे यांच्या पत्राची दखल घेत येथील विद्यार्थ्यांना दोन स्पीड बोट आणि लाईफ जॅकेट पुरवण्याच्या सूचना प्रशासनाला केल्या. याबाबत आमदार सत्यजित तांबे यांना माहिती मिळाल्यावर त्यांनी आपल्या ट्विटर हँडलवर मुख्यमंत्र्यांचे आभार मानत “कामाचा माणूस” अशी ओळख एकनाथ शिंदे साहेब यांनी पुन्हा एकदा सिद्ध केली, असे म्हणत कौतुक केले आहे.