संजीवनी शैक्षणिक संकुलात जोखीम मूल्यांकन, व्यवस्थापन आणि ब्रॅन्ड संरक्षण विषयावर मार्गदर्शन
कोपरगांव: प्रत्येक शैक्षणिक संस्था, आस्थापना, इत्यादी ठिकाणी कायदे असतातच, परंतु त्या कायद्यांचे पालन करणे गरजेचे आहे, नाहीतर संबंधितांवर जोखीम ओढावते, म्हणुन प्रत्येक ठिाकणच्या जोखमी ओळखा, त्यांचे मूल्यांकन करा, त्या जोखमी ओढावणार नाही याचे व्यवस्थापन करा, आणि प्रदिर्घ कालखंडात जो नावलौकिक प्राप्त केला आहे, त्या ब्रॅन्डचे संरक्षण करा, असे प्रतिपादन पीटूएचटू कन्सलटंटस्चे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर, १६० देशात कार्यरत असलेल्या सिटी बॅन्कचे माजी डायरेक्टर, दुटस्छे बॅन्केचे माजी व्हाईस प्रेसिडेंट, महाराष्ट्र पोलीसचे माजी सिनिअर इन्स्पेक्टर, युनायटेड नेशन्सचे माजी स्टेशन कमांडर आणि अशा अनेक बिरूदावल्या असलेले अरूण वाबळे यांनी केले.
संजीवनी विद्यापीठ व संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या सल्लागार समितीच्या जोखीम मूल्यांकन, व्यवस्थापन आणि ब्रॅन्ड संरक्षण संदर्भात श्री वाबळे यांची डायरेक्टर म्हणुन नुकतीच नियुक्ती झाली. या दोनही संकुलातील प्रा.व्हाईस चांसलर, डायरेक्टर्स, प्राचार्य, डीन्स व विभागीय विभाग प्रमुख यांचे समोर बाबळे यांनी जोखीम मूल्यांकन, व्यवस्थापन आणि ब्रॅन्ड संरक्षण या विषयावर प्राथमिक स्वरूपात आपले विचार मांडले. अध्यक्षस्थानी संजीवनी अध्यक्ष नितिनदादा कोल्हे होते. तसेच युवक कॉंग्रेसचे माजी नेते सुभाषराव भदगले हेही व्यासपीठावर उपस्थित होते. प्रारंभी मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे यांनी जोखीम मूल्यांकन, व्यवस्थापन आणि ब्रॅन्ड संरक्षणचे महत्व सांगुन या सर्व बाबी कशा महत्वाच्या आहेत, हे स्पष्ट केले.
वाबळे पुढे म्हणाले की शैक्षणिक संस्थेत तरूण पिढी वावरत असते. ही पिढी घसरड्या वळणावरून जात असते. अशा परीस्थितीत जोखमींचे मूल्यांकन, त्यांचे व्यवस्थापन वेळीच नाही केले तर पश्चिम बंगाल मधिल मेडिकल कॉलेज आणि बदलापुर सारख्या घटना घडतात, आणि संस्थांनी जपलेला ब्रँड कोसळतो. अशा प्रकारे त्यांनी इतर काही संस्था व आस्थापनांचीही उदाहरणे देवुन मुळ विषयला बळकटी दिली. तसेच वेगवेगळ्या कामांसाठी मनुष्यबळ निवडताना काही टीप्सही दिल्या तसेच शैक्षणिक संस्थांमधिल जोखीमाही सांगीतल्या. जोखमी निर्माण होवुच नये, यासाठी त्यांनी त्रीसुत्रीचा अवलंब करावा, असे सुचविले. पहिली इंजिनिअरींग म्हणजे धोरणे आणि नियमांची रचना करावी, दुसरी एज्युुकेशन म्हणजे संबंधीतांमध्ये जोखमींच्या परीणामांची जागृती करावी आणि तिसरी एनफोर्समेंट म्हणजे जी धोरणे आणि नियमांची रचना केलेली आहे, त्यांची काटेकोर अंमलबजावणी करावी. जोखीम मूल्यांकन, व्यवस्थापन आणि ब्रॅन्ड संरक्षण हा उपक्रम राबविणारा संजीवनी शैक्षणिक संकुलने पुढाकार घेतल्यामुळे विद्यार्थी , शिक्षक आणि संस्थेलाही फायदा होणार असल्याचे वाबळे यांनी म्हटले.
अध्यक्ष स्थानावरून नितिनदादा कोल्हे म्हणाले की एखाद्या संस्थेला नावलौकिक (ब्रॅन्ड नेम) मिळवायला अनेक वर्षे लागतात, परंतु तो टिकविणे ही सर्वांचीच सामुहिक जबाबदारी असते. परंतु या सर्व बाबींच्या मार्गदर्शनासाठी अरूण वाबळे यांच्या माध्यमातुन सर्व बारीक सारीक बाबींची माहिती व माहितीची अंमलबजाणी करण्याचा प्रदिर्घ अनुभवी व्यक्तिमत्व संजीवनीला मिळाले आहे.