संगमनेर : नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्गावरून भरधाव वेगाने जाणाऱ्या मारुती स्विप्ट कारने दुभाजकाला लावलेले बॅरेकेट उडवून काम करणाऱ्या दोन मजुरांना जोराची धडक दिली. या धडकेत दोन परप्रांतीय मजूर जागीच ठार झाले. मंगळवारी सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास बायपास वरील मालपाणी कारखान्यांजवळ हा अपघात झाला. गिरीजा मुनसी तुरिया (वय ५२) व सुरेश चेतू खैरवार (वय ५५) अशी अपघातात ठार झालेल्या दोघा मजुरांची नावे आहेत. नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील शुशोभीकरणाचे काम घेतलेल्या कयास कन्ट्रक्शन कंपनीकडे ते लेबर म्हणून कामाला होते. मंगळवारी सायंकाळी नाशिक-पुणे बायपासच्या दुभाजकावरील झाडांची कटिंग ते करत होते. सुरक्षेसाठी त्यांनी दुभाजकाजवळ बॅरिकेट्स देखील लावले होते. मात्र, नाशिकहून पुण्याकडे भरधाव वेगाने जाणारी मारुती स्विप्ट कार (एम.एच. १४ जे.एच. ०८३४) वरील चालकाने दुभाजक व बॅरिकेट्सला उडवून काम करत असणाऱ्या गिरीजा मुनशी तुरिया (रखा. गहलोर बोडकी, ईस्लाम नगर, अली गज ,ग्लोरिया, जुमई, मोकामा, बिहार) आणि सुरेश चेतू खैरवार (रा. गहलोर, पोस्ट मरकामा, गहलोर, जुमई, मरकामा, बिहार) या दोघांना धडक दिली. या जोरदार धडकेने दोघे मजुर जागीच ठार झाले. कयास कन्ट्रक्शन कंपनीचे सुपरवायझर अमोल सुभाष बनसोडे (आनंदवाडी, चंदनापुरी) यांच्या फिर्यादीवरून कार चालक निशीकांत संजय घोडेकर (पंचवटी, नाशिक) याच्यावर शहर पोलिसांनी अपघाताचा गुन्हा दाखल केला आहे.