कोपरगाव : माजी मंत्री सहकारमहर्षी स्व. शंकरराव कोल्हेसाहेब यांनी एकेकाळी बंद पडलेला गणेश सहकारी साखर कारखाना प्रतिकूल काळातही चालू करून, यशस्वीरीत्या चालवून या परिसराचे भाग्य उजळण्याचे काम केले. गणेश कारखाना व स्व.शंकरराव कोल्हे यांचे अतूट नाते असल्याने गणेश परिसराची ही कामधेनु वाचविण्यासाठी सभासद शेतकरी व कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव आज बैठक घेऊन त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. सर्व कार्यकर्त्यांच्या भावनांचा आदर करून त्यांना विश्वासात घेऊन गणेश कारखान्याची निवडणूक लढविण्याबाबत योग्य निर्णय घेऊ, अशी ग्वाही सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष तथा अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक युवा नेते विवेक कोल्हे यांनी दिली.
गणेश परिसराची कामधेनु म्हणून ओळखल्या जाणार्या गणेश सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे. या निवडणुकीसाठी १५ मेपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर गणेश कारखान्याच्या सभासद शेतकरी व कार्यकर्त्यांनी पुणतांबा येथे युवा नेते विवेक कोल्हे यांची गाडी अडवून गणेश साखर कारखाना वाचविण्यासाठी संचालक मंडळाच्या निवडणुकीत व्यक्तिश: लक्ष घालावे, अशी आग्रही विनंती त्यांना केली होती. त्या अनुषंगाने मंगळवारी (१६ मे २०२३) साकुरी (ता. राहाता) येथील शिव-पार्वती लॉन्स येथे विचारविनिमय करण्यासाठी एक बैठक आयोजित केली होती. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी गणेश कारखान्याचे माजी संचालक गंगाधरराव चौधरी होते. या बैठकीत युवा नेते विवेक कोल्हे यांनी कारखान्याचे माजी संचालक, सभासद व कार्यकर्त्यांचे म्हणणे ऐकून घेतले.
गणेश परिसरात माजी मंत्री स्व. शंकरराव कोल्हेसाहेब यांना मानणारा मोठा वर्ग आहे. राज्यात बंद पडलेले सहकारी साखर कारखाने कसे चालवावेत हे स्व. शंकरराव कोल्हेसाहेब यांनी प्रत्यक्ष कृतीतून दाखवून दिले होते. गणेश परिसराची कामधेनु असलेला गणेश सहकारी साखर कारखाना १९८७ मध्ये बंद पडल्यानंतर तो कार्यान्वित करून ऊर्जितावस्थेत व नावारूपाला आणण्यासाठी स्व. शंकरराव कोल्हेसाहेब यांनी खूप परिश्रम घेतले आहेत. त्याची जाणीव या भागातील सभासद शेतकऱ्यांना आहे.‘कोल्हे पॅटर्न’मुळे ऊस उत्पादक आणि कारखाना यांच्यात समन्वय राहिला आहे. गणेश कारखाना ही कुणा एकाची मालमत्ता नसून हा कारखाना सर्व सभासद शेतकऱ्यांचा आहे. त्यांना विश्वासात घेऊनच निर्णय झाले पाहिजेत; पण हा कारखाना दुसऱ्यांच्या ताब्यात गेल्यानंतर सभासद शेतकऱ्यांना विश्वासात न घेता एकतर्फी निर्णय होत आहेत. त्यामुळे असंतोष पसरला आहे. आम्ही फक्त विधानसभा निवडणुकीत तुमचे ओझे वाहायचे का? आम्हाला न्याय कोण देणार? असा प्रश्न उपस्थित करत अनेक सभासद व कार्यकर्त्यांनी यावेळी संतप्त भावना व्यक्त केल्या.
याप्रसंगी गणेश कारखान्याचे माजी अध्यक्ष नारायणराव कार्ले म्हणाले, माजी मंत्री स्व. शंकरराव कोल्हेसाहेब हे सहकार चळवळ व साखर उद्योगातील भीष्माचार्य होते. साखर कारखानदारीचे गाढे अभ्यासक असलेल्या स्व.शंकरराव कोल्हेसाहेब यांनी १९८७ साली बंद पडलेला गणेश सहकारी साखर कारखाना प्रतिकूल परिस्थितीवर मात करत पुन्हा सुरू केला. कारखान्याची कार्यक्षमता वाढविण्यासाठी यंत्रसामग्रीत बदल केला. ३०,००० लिटर प्रतिदिन उत्पादन क्षमतेची डिस्टीलरी उभारली. ६ बुलडोझर खरेदी करून १७५ गणेश बंधारे बांधले. शेतकरी सभासद, कामगारांना रोजीरोटी देणाऱ्या गणेश कारखान्याला त्यांनी गतवैभव मिळवून दिले. सभासद शेतकरी, कामगार व कारखान्याचे हित जोपासले. या कारखान्याच्या विकासाचे संपूर्ण श्रेय स्व.शंकरराव कोल्हेसाहेब यांना जाते. सर्वाधिक काळ या कारखान्याचा कारभार माजी मंत्री स्व.शंकरराव कोल्हे यांच्या विचारांच्या संचालक मंडळाने पाहिला आहे. स्व. कोल्हेसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली कै. भानुदासराव दंडवते, कै. भास्करराव जाधव, कै. विष्णूभाऊ धनवटे, कै. भागवतराव गोर्डे, कै. रामचंद्र कोते, कै. गणपतराव शेळके, कै. अप्पासाहेब शेळके, कै. उमाकांत तुरकणे, कै. परसराम मते, कै. बाळासाहेब वाघ, कै. दिलीपराव गाढवे, कै. उत्तमराव फोफसे, कै. पंडितराव लहारे, कै. दिवाणराव शेळके, कै. रावसाहेब लहारे आदींनी गणेश कारखाना ३० वर्षे यशस्वीरीत्या चालवला; पण हा कारखाना कोल्हे गटाच्या ताब्यातून दुसऱ्याकडे गेल्यापासून कारखान्याची, शेतकऱ्यांची व कामगारांची वाताहत झाली आहे. स्व. कोल्हेसाहेबांच्या काळात सर्व संचालक मंडळाला विश्वासात घेऊन कारखान्याच्या हिताचे सर्व निर्णय होत होते. आता मात्र जुन्या जाणत्या संचालकांना, सभासदांना विश्वासात न घेता एकतर्फी निर्णय घेतले जात आहेत.
गणेश कारखाना भाडेतत्त्वावर दिल्यापासून उसाला २००-३०० रुपये कमी भाव मिळत आहे. सभासदांना ठेवीवरील व्याज दिले गेले नाही. सभासदांना साखर दिली नाही. कामगारांना थकीत पगार दिला नाही. कारखाना पुरेशा कार्यक्षमतेने चालला नसल्याने ऊसतोडी वेळेवर झाल्या नसल्याने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. स्व. शंकरराव कोल्हेसाहेबांनी शेतकऱ्यांचा पाटपाण्याचा प्रश्न सोडवला. मात्र, आता शेतकऱ्यांना पाटपाणी मिळण्यासाठी खूप संघर्ष करावा लागत आहे. गणेश कारखान्याला गतवैभव मिळवून देऊन सभासद शेतकऱ्यांचे हित साधण्यासाठी या निवडणुकीत निर्णायक भूमिका घेणे गरजेचे आहे, असे मत गणेश कारखान्याचे माजी उपाध्यक्ष शिवाजीराव लहारे, शिवसेना प्रणित शेतकरी सेनेचे प्रदेशाध्यक्ष धनंजय जाधव, कारखान्याचे माजी संचालक संजय सरोदे, अशोकराव दंडवते, चंद्रभान धनवटे, सर्जेराव जाधव, सुनील कोते, विलास बढे, निळवंडे कृती समितीचे अध्यक्ष नानासाहेब शेळके आदींनी मांडले. सूत्रसंचालन भाजयुमोचे कोपरगाव तालुकाध्यक्ष विक्रम पाचोरे यांनी केले, तर भाऊसाहेब चौधरी यांनी आभार मानले.
बैठकीस कारखान्याचे माजी संचालक भाऊसाहेब चौधरी, मधुकर सातव, आबासाहेब बोठे पाटील, सीताराम गाडेकर, भगवानराव टिळेकर, दिलीपराव क्षीरसागर, वर्धमान पतसंस्थेचे संचालक विठ्ठलराव गोरे, सुभाष पाटील, भाजपचे माजी राहाता तालुका उपाध्यक्ष राजेंद्र लहारे आदींसह कारखान्याचे सभासद शेतकरी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.