वाशिम : गायरान जमीन प्रकरण, सिल्लोड कृषी महोत्सवाच्या नावाने पैसे गोळा केल्याच्या आरोपांमुळे अडचणीत आलेल्या कृषीमंत्री अब्दुल सत्तारांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.
अब्दुल सत्तार यांच्या संपत्तीची चौकशी करण्याची मागणी करत थेट सीबीआयकडे दोन वेगवेगळ्या तक्रार दाखल करण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. अब्दुल सत्तार यांच्या मतदारसंघातील सामाजिक कार्यकर्ते महेश शंकरपेल्ली यांच्यासह एकूण पाच जणांनी या प्रकरणी एकत्रित तक्रारी दाखल केल्या आहेत.
सत्तार यांच्याविरोधात तब्बल 1 हजार 400 पानांची तक्रार करण्यात आली आहे. तक्रारीत एकूण 28 मुद्दे मांडण्यात आले आहेत. शेतकऱ्यांनी 200 पुराव्यानिशी तक्रार दाखल केली आहे.
सत्तार यांनी जमिनी कशा बळकावल्या याचे पुरावे या तक्रारीत असल्याचा दावा देखील सामाजिक कार्यकर्ते महेश शंकरपेल्ली यांनी केला आहे.
वाशिम जिल्ह्यातील एका गायरान जमिनीचं प्रकरण आणि कृषीप्रदर्शनासाठी पैसे गोळा करण्याच्या आरोपावरून हिवाळी अधिवेशनादरम्यान सभागृहात विरोधकांनी अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती.