कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत जि. प. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची कारवाई
राहुरी / प्रतिनिधी
राष्ट्रीय बाल हक्क व संरक्षण आयोग समिती (नवी दिल्ली) यांच्या चौकशीच्या फेऱ्यातून निसटण्यासाठी शाळेतील एका शिक्षिकेवर कारवाई होण्यासाठी केंद्रप्रमुखांनी खड्डा खोदला परंतू त्याच खड्ड्यात केंद्रप्रमुख निलिमा गायकवाड स्वतःच पडल्या आहेत.जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी गायकवाड यांच्या खुलाशातील हाच मुद्दा गृहित धरुन वरिष्ठांना त्या बाबतची कल्पना का दिली नाही. जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी केंद्रप्रमुख निलिमा गायकवाड यांच्यावर कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत, त्यांची तात्पुरत्या स्वरुपात एक वेतनवाढ रोखण्याचा आदेश बजावल्याने शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेमध्ये विद्यार्थ्यांना कपाटासह इतर जड वस्तू उचलविण्यास भाग पाडणे राहुरी तालुक्यातील देवळाली केंद्राच्या प्रमुख निलिमा गणपत गायकवाड यांना चांगलेच महाग पडले आहे. दरम्यान, या प्रकाराबाबत राजेंद्र उंडे यांनी तक्रार केली होती.यावर जिल्हा परिषदेत सुनावणी झाली. यावेळी दोन्ही बाजुंनी खुलासा केल्यानंतर जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी केंद्रप्रमुख निलिमा गायकवाड यांच्यावर कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवला होता.
देवळाली प्रवरा जि. प.शाळेत लोकसभा निवडणुकीवेळी अवजड साहित्यासह कपाटे हलविण्याचे काम सुरु होते. त्यावेळी काही विद्यार्थी अवजड कपाट वर्गातून बाहेर काढत असल्याचे छायाचित्र राजेंद्र उंडे यांनी सादर करुन, राष्ट्रीय बाल हक्क व संरक्षण आयोग समिती (नवी दिल्ली) यांच्याकडे तक्रार केली होती.या पार्श्वभूमीवर जि. प. प्रशासनाने गटशिक्षण अधिकाऱ्यांना या तक्रारीबाबत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. या प्रकरणी केंद्रप्रमुख निलिमा गायकवाड यांनी कर्तव्यात कसूर केल्याबाबत खुलासा मागितला होता. केंद्रप्रमुख गायकवाड यांनी खुलासा देत नमूद केले होते की, तक्रारदार उंडे यांचा शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदावरून पाय-उतार झाल्याने त्यांनी वैफल्यग्रस्त होत तक्रार दिली आहे.जड वस्तू हलविण्यासाठी मजूर होते.त्यांच्यामार्फतच वस्तू हलविल्या. त्यांचे मजुरीचे अदा बील सादर केले आहे.कपाट हलविताना विद्यार्थी कुतूहलातून तेथे जमा झाले असताना त्यांचे छायाचित्र काढले होते,असा खुलासा गायकवाड यांनी केला.
श्रीम. निलीमा गणपत गायकवाड यांचे 20 डिसेंबर 2024 च्या खुलाशात जि.प. प्राथ.शाळा देवळाली प्रवरा येथे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्षपद हे 24 जुलै 2023 पासून रिक्त होते. तसेच उपाध्यापक श्रीम. सुप्रिया आंबेकर या मुख्याध्यापकांशी उद्धटपणे वागतात, शासकीय कामात व्यत्यय आणणे असे वर्तन होते असे खुलाशात नमूद करुन त्या शिक्षिकेला गुंतविण्याचा प्रयत्न केला गेला परंतू ती शिक्षिका उद्धटपणे वागत होती तर सदरची बाब केंद्रप्रमुख देवळाली प्रवरा निलीमा गणपत गायकवाड, यांनी वरिष्ठांना अवगत करणे आवश्यक़ होते. परंतु सदरची बाब गायकवाड यांनी निदर्शनास आणलेली नाही.केंद्रप्रमुख पदाचे कर्तव्यात कसूर झाल्याची बाब निर्दशनास येत असल्याने त्यामुळे खुलासा अमान्य करणेत येत आहे. जिल्हा परिषद कर्मचा-यांने नेहमी सचोटीने वागणे, कर्तव्य परायण असणे आवश्यक आहे तथापी आपण केंद्रप्रमुख पदाचे कर्तव्यात कसूर केलेला आहे त्याअर्थी आपलेकडुन म.जि.प.जि.से. (वर्तणूक) नियम 1967 चे नियम 3 चा भंग झालेला आहे.केंद्रप्रमुख निलीमा गायकवाड यांच्यावर शिस्तभंगाचा ठपका ठेवत, कारवाईचा आदेश दिला. तात्पुरत्या स्वरुपात एक वेतनवाढ रोखत, नोंद सेवा पुस्तकात तसे नमूद करण्याचा आदेश दिला आहे.
चौकट
राष्ट्रीय बाल हक्क व संरक्षण आयोग समिती (नवी दिल्ली) यांच्याकडे राजेंद्र उंडे यांच्या तक्रारीनुसार केंद्रप्रमुख गायकवाड यांनी कामकाजात कसूर करुन,शिस्तभंग केल्याचा आदेश प्रशासनाने दिला आहे.या अनुषंगाने कारवाई करुन, अहवाल सादर करणार आहे.
मोहनीराज तुंभारे ,गट शिक्षणाधिकारी, राहुरी.