कोपरगांव: स्थानिक के.जे.सोमैया (वरिष्ठ) व के.बी.रोहमारे (कनिष्ठ) महाविद्यालयात हिंदी विभाग व राष्ट्रभाषा सेवा मंच, कोपरगांव यांच्या संयुक्त विद्यमाने हिंदी दिवस व पुरस्कार वितरण समारोह कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध हास्य कवी व सब टि.व्ही. फेम मा. संजय बन्सल यांना आमंत्रित करण्यात आले होते. या समारोह कार्यक्रमासाठी कोपरगांव तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मा. अशोकराव रोहमारे, राष्ट्रभाषा सेवा मंच चे अध्यक्ष मा.पद्मकांतजी कुदळे व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.एस.यादव हे उपस्थित होते. यावेळी हास्य कवी मा. संजय बन्सल यांनी हिंदी भाषेचे महत्व विषद करतानांच आपल्या मिश्किल शैलीने उपस्थित विद्यार्थांना खिळवून ठेवले. मोबाईल सारख्या आधुनिक तत्रज्ञानाच्या अति वापरामुळे होणारा दुष्परिणाम त्यांनी काव्य शैलीतून नमूद केला. आपल्या विनोदी शैलीने श्रोत्यांची वाहवा मिळवितांनाच हास्य कवितेतून शैक्षणिक व सामाजिक विचारही विद्यार्थी मनावर बिंबविले.
स्वागत मनोगतात मा.पद्मकांतजी कुदळे यांनी राष्ट्रभाषा सेवा मंच ची हिंदी भाषा प्रचार-प्रसाराची प्रदीर्घ परंपरा व हिंदी भाषेच्या विकासासाठी ग्रंथालय करत असलेली कामे नमूद केली. के.जे.सोमैया (वरिष्ठ) व के.बी.रोहमारे (कनिष्ठ) महाविद्यालय हे शैक्षणिक क्षेत्रात अग्रेसर असलेले महाविद्यालय असून हिंदी विभागाच्या वतीने प्रत्येक वर्षी राबविण्यात येणारा हिंदी दिवस हा हिंदी सप्ताह म्हणुन साजरा केला जातो ही अभिमानाची बाब असल्याचेही त्यांनी सांगितले.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.एस.यादव यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतात हिंदी भाषा ही ज्ञानभाषा व विकासाची भाषा म्हणुन ओळखली जात असल्याने नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात हिंदी भाषेला महत्वाचे स्थान देण्यात आले आहे. महाविद्यालयातील हिंदी विभागाच्या वतीने आयोजित करण्यात येत असलेल्या विद्यार्थी केंद्रित अनेक उपक्रमांचे कौतुक करतांनाच हिंदी भाषा ही साहित्य, समाज व संस्कृतिचा अलौकिक ठेवा असल्याने हिंदी भाषेचा प्रचार व प्रसार करण्याची जबाबदारी सर्व भारतीयांची असल्याचे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात राष्ट्रभाषा सेवा मंच चे कार्यवाहक श्री. सुरेश गोरे सर यांनी उपस्थित मान्यवरांचा परिचय करून देतानांच हिंदी व मराठी ग्रंथालय, कोपरगांव व महाविद्यालयाच्या हिंदी विभागाच्या वतीने हिंदी दिवसाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या विविध स्पर्धेचे विवरण केले. हिंदी विभागप्रमुख डॉ. संजय दवंगे यांनी विभागाच्या वतीने घेण्यात आलेल्या निबंध, स्वलिखीत कविता वाचन, हस्ताक्षर, वक्तृत्व अश्या विविध स्पर्धेच्या बक्षिसांचे वाचन केले. यावेळी राष्ट्रभाषा सेवा मंचच्या वतीने आयोजित शायरी व कविता लेखन स्पर्धेचे बक्षीस वितरण ही करण्यात आले. या कार्यक्रमांसाठी संस्थेचे विश्वस्त मा. संदिपराव रोहमारे, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य बी.आर.सोनवणे, प्रो.(डॉ) विजय ठाणगे, प्रो.(डॉ) के.एल.गिरमकर, प्रो.(डॉ) एस.आर.पगारे, डॉ. गणेश देशमुख, चास येथील कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य नारायण बारे, महाविद्यालयाचे रजिस्ट्रार डॉ.अभिजीत नाईकवाडे, कोपरगांव येथील बँक ऑफ महाराष्ट्र शाखा अधिकारी मा. रणजीत झा, बँक ऑफ बडोदा शाखा अधिकारी मा. दिपकराज जांभरूनकर, प्रो.(डॉ) संजय अरगडे, डॉ. रविंद्र जाधव हे उपस्थित होते. हिंदी दिवस समारोह कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रो.(डॉ) जे.एस.मोरे यांनी तर आभार कनिष्ठ महाविद्यालयातील हिंदी विषयाचे प्राध्यापक जे.आर.भोंडवे यांनी मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा.डी.जे.जाधव, प्रा.श्रध्दा खालकर, प्रा.पुजा गख्खड, प्रा.मधूमिता निळेकर,योगेश कोळगे, प्रमोद येवले यांनी विशेष परिश्रम घेतले. हिंदी दिवस व पुरस्कार वितरण समारोह कार्यक्रमासाठी कोपरगांव परिसरातील हिंदी प्रेमी मान्यवर, पालक व बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.