कोपरगाव : येथील के. जे. सोमैया महाविद्यालयातील वाणिज्य शाखेतील सहयोगी प्राध्यापक डॉ. रवींद्र जाधव यांनी ‘कोल्याबरेटिव्ह टिचींग ‘ या अंतर्गत ‘ लाभांश धोरण ‘ या विषयावर . आय. टि.एम. मारा विद्यापीठ, मलेशिया या प्रसिद्ध विद्यापिठातील ‘अकाऊंटन्सी फॅकल्टी’ मधील प्राध्यापक व २२३ विद्यार्थ्यांसमोर ऑनलाईन पद्धतीने व्याख्यान दिले. डॉ. रवींद्र जाधव यांनी मागील दोन वर्षांपासून दोन आंतरराष्ट्रीय सामंजस्थ करारासह अशा अनेक आंतरराष्ट्रीय उपक्रमांचे यशस्वी आयोजन महाविद्यालयात केले असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी.एस. यादव यांनी याप्रसंगी दिली.
डॉ. रवींद्र जाधव यांनी आपल्या व्याख्यानात लाभांश धोरण, त्यावर परिणाम करणारे घटक, मॅट्रिक्स, लाभांश धोरणाचे फायदे, प्रकार, लाभांश वाटप प्रक्रिया, लाभांशचे विविध सिद्धांत, मोदिग्लीआनी व मिलर चा अप्रासंगिकता सिद्धांत, गॉर्डन व लिटनर ची बर्ड इन हॅण्ड प्रासंगिकता सिद्धांत, लाभांश कर प्राधान्य सिद्धान्त,लाभांश ग्राहक प्रभाव सिद्धांत,माहिती सामग्री सिद्धांत इ. घटकावर विस्तृत प्रकाश टाकला. हे व्याख्यान दोन्ही संस्थांमधील सामंजस्थ कराराच्या अंतर्गत घेण्यात आले तसेच मागील दोन वर्षांपासून दोन्ही शैक्षणिक संस्थांच्या दरम्यान विविध शैक्षणिक उपक्रम घेण्यात आल्याची माहिती अंतर्गत हमी कक्षाचे समन्वयक डॉ. विजय ठाणगे व या सामंजस्थ कराराचे समन्वयक डॉ. रवींद्र जाधव यांनी दिली. याप्रसंगी या व्याख्यानाच्या समन्वयक व मारा विद्यापीठातील जेष्ठ प्राध्यापक डॉ. मार्झलिन मारझुकी, डॉ मुस्लीमाह मोहम्मद जमील, डॉ मुहम्मद हारीझ हमीद व डॉ. अरिफ इम्रान मोहम्मद इ. अकाऊंटन्सी विभागातील प्राध्यापक उपस्थित होते.
कोपरगाव तालुका एज्युकेशन संस्थेचे अध्यक्ष अशोकराव रोहमारे, सचिव ऍड. संजीव कुलकर्णी, विश्वस्त संदीप रोहमारे, प्राचार्य डॉ.बी. एस. यादव, रजिस्ट्रार अभिजीत नाईकवाडे यांनी डॉ. रवींद्र जाधव यांचे अभिनंदन केले आहे. तसेच पुढील शैक्षणिक उपक्रमांसाठी त्यांना शुभेच्छा दिल्यात.