कोपरगाव प्रतिनिधी ;
के. जे. सोमैया महाविद्यालय व महाराष्ट्र शासनाच्या ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ या उपक्रमाअंतर्गत ‘वाचनाचे महत्व’ या विषयावर कार्यशाळा गुरुवार दि. ९/०१/२०२५ रोजी सकाळी ९:३० वाजता महाविद्यालयाच्या साकरबेन सभागृहात संपन्न झाली. यामध्ये प्रसिद्ध युवा कवी व व्याख्याते प्रा. अमोल चिने यांनी आपल्या बहारदार शैलीतून पुस्तकांचे विद्यार्थ्यांच्या जीवनातील महत्व, आपल्या जीवनातील कवितेचा उगम आदी मुद्यांना स्पर्श करीत आपल्यातील कवित्वाचे श्रेय आपल्या आईला दिले.
आईच्या कष्टाच्या घामातून कवितेचा उगम झाला, तिचाच आधार घेऊन व तिच्या कष्टाची जाणीव ठेऊन आपण युवा पिढी घडवण्याचे शस्र उपसले, तसेच स्पर्धा परीक्षेसाठीही वाचन किती महत्वाचे आहे हे ही विद्यार्थ्यांना पटवून दिले. शेवटी आपली ‘बाप’ ही कविता सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.
अध्यक्षीय भाषणात प्रा. डॉ. एस. आर. पगारे यांनी प्रा. चिने यांच्या कवितेला मी अनुसरून तुम्ही आम्हाला दोन बाप उलगडून दाखवलेत असे गौरवोद्गार काढले , तसेच सुसज्ज्य असे ग्रंथालय व त्यातील मौल्यवान ग्रंथसंग्रह यांची माहिती, जाणीव विद्यार्थ्यांना करून दिली .
महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. विजय सी. ठाणगे यांनी मान्यवरांचे स्वागत करताना विद्यार्थ्यांना ग्रंथ, ग्रंथालय व वाचन यांचे महत्त्व विशद केले. प्रारंभी महाविद्यालयाच्या ग्रंथालय विभाग प्रमुख डॉ. नीता शिंदे यांनी प्रास्ताविक करताना वाचन संकल्प महाराष्ट्राचा अंतर्गत घेण्यात येणाऱ्या वाचन कौशल्य कार्यशाळा, वाचन संवाद, पुस्तक परीक्षण व निबंध स्पर्धा, आदी सर्व उपक्रमाविषयी माहिती दिली. प्रिंट रिसोर्सेस सोबतच सध्याच्या जमान्यात ई-रिसोर्सेसलाही किती महत्व आहे हे ही त्यांनी विशद केले.
मान्यवरांचा परिचय हिंदी विभाग प्रमुख डॉ. जिभाऊ मोरे यांनी करून दिला. तसेच महाविद्यालयाच्या ग्रंथालयातील उत्कृष्ट अशा कथा, कादंबऱ्या, नाटके याविषयी सखोल मार्गदर्शन केले. वाचनाने मनुष्याच्या जीवनात होणाऱ्या सकारात्मक बदलाविषयी त्यांनी अनेक उदाहरणे पटवून दिली.
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन ही ग्रंथपाल डॉ. नीता शिंदे यांनी केले.तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इंग्रजी विभागाच्या प्रा. वर्षा आहेर यांनी केले. कार्यक्रमाला मराठी, हिंदी, वाणिज्य, विज्ञान या सर्वच शाखेतील प्राध्यापक वर्ग, तसेच महाविद्यालयाचे रजिस्ट्रार डॉ. अभिजित नाईकवाडे यांची प्रमुख उपस्थिती होती. सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ग्रंथालय विभागाचे विकास सोनवणे, गणेश पाचोरे, अजय पिठे, वेताळ संजय, निरगुडे गणेश, आदींनी विशेष परिश्रम घेतले.