कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव शहराची पाणी टंचाई सर्वश्रुत होती.त्यामुळे नळाला आठ दिवसांनी येणारे पाणी कोपरगावकरांच्या पाचवीलाच पुंजले होते. अधिक टंचाईची परिस्थिती निर्माण झाल्यास कधी पंधरा तर कधी एकवीस दिवसांनी पाणी पुरवठा झाल्यानंतर कोपरगाव शहरातील नागरिकांनी त्यातही महिलांनी किती हाल सोसले असेल याची कोपरगावकरांना कल्पना आहे. या परिस्थितीची दखल घेवून हि परिस्थिती आ.आशुतोष काळे यांनी बदलविली असून त्यांच्या रूपाने कोपरगावला आधुनिक भगीरथ भेटला आणि या भगीरथाने हि परिस्थिती बदलुन दाखवली.त्यामुळे या भगीरथाने कोपरगाव शहराच्या पाणी प्रश्नासाठी दिलेले अनमोल योगदान कोपरगावकर कधीही विसरणार नाही आणि बुधवार (दि.२०) रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत कोपरगावचे सुजाण मतदार आ.आशुतोष काळे यांना मोठ्या मताधीक्याने निवडून देतील असा विश्वास माजी नगरसेवक मंदार पहाडे यांनी व्यक्त केला.
कोपरगाव शहरातील विजय नगर आणि समता नगर मध्ये महायुतीचे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार आ.आशुतोष काळे यांच्या प्रचारार्थ जिल्हा बँकेच्या माजी संचालिका सौ.चैताली ताई काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आलेल्या कॉर्नर सभेत माजी नगरसेवक मंदार पहाडे बोलत होते. ते पुढे म्हणाले की, कोपरगाव शहराची पाणी टंचाई दूर करण्यासाठी प्रयत्न झाले परंतु यश येत नव्हते. आठ, दहा, बारा, सोळा कधी तर तेवीस दिवसांनी नागरिकांना पाणी पुरवठा केला जात होता. कोपरगाव शहराच्या लोकसंख्येच्या तुलनेत कोपरगाव शहराला पाणी साठा आरक्षित आहे. परंतु कोपरगाव शहराला पाणी पुरवठा करणारे एक ते चार साठवण तलावाची साठवण क्षमता कमी झाल्यामुळे हे साठवण तलाव कोपरगाव शहराची तहान भागविण्यात असमर्थ ठरले होते. त्यामुळे पाणी आरक्षित असूनही पूर्ण क्षमतेने पाणी उचलेले जात नाही. त्यामुळे कोपरगावकर नियमित पाण्यापासून वंचित आहे. त्यासाठी गरज आहे साठवण क्षमता वाढविण्याची हे आ.आशुतोष काळे यांच्या चाणाक्ष बुद्धीने नेमके हेरले. २०१९ ला पाणी प्रश्न सोडवून दाखविण्याचे आश्वासित करून सत्ताधारी पक्षाचा आमदार होण्याच्या संधीचा फायदा घेवून निवडून येताच दोनच महिन्यात ५ नंबर साठवण तलावाचे खोदाईचे काम आ.आशुतोष काळे यांनी सुरु केले.
त्यानंतर ५ नंबर साठवण तलावाची तांत्रिक मान्यता मिळविली व १३१.२४ कोटी निधी देखील आणला.पाणी आरक्षित करण्यासाठी कोपरगाव नगरपालिकेची थकीत पाणी पट्टी भरणे गरजेचे असतांना पाटबंधारे विभाग व नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांची बैठक घेवून थकीत पाणी पट्टीच्या रक्कमेचे हफ्ते पाडून घेत पुढील २५ वर्षाच्या वाढणाऱ्या लोकसंख्येचा विचार करून शेतीच्या पाण्याला कुठेही धक्का न लावता अतिरिक्त ३.३६ एमएलडी पाणी आरक्षित करून घेतले. ५ नंबर साठवण तलावाची १५ टक्केची २० कोटी रक्कम भरायची कोपरगाव नगरपरिषदेची आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे कोपरगावकरांना आर्थिक झळ बसू नये यासाठी आ.आशुतोष काळे यांनी आपले राजकीय वजन वापरून उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांच्या सहकार्यातून हि रक्कम देखील माफ करून आणली व ५ नंबर साठवण तलावाचे काम पूर्ण केले. त्यामुळे कोपरगावच्या नागरिकांना तीन दिवसाआड पूर्ण दाबाने स्वच्छ पाणी मिळत आहे. वितरण व्यवस्थेचे उर्वरित काम पूर्ण होताच व सर्व नळ कनेक्शन नवीन वितरीकांना जोडल्यानंतर सर्वच नागरिकांना नियमितपणे पाणी मिळणार आहे.
कोपरगाव शहराच्या विकासा बरोबरच पाणी प्रश्न सोडविण्याचे एवढे मोठे व पुण्याचे काम आ. आशुतोष काळे नावाच्या आधुनिक भगीरथाने केलेले आहे. त्यांनी त्यांचा शब्द आणि जबाबदारी पूर्ण केलेली आहे. आता जबाबदारी पार पाडण्याची वेळ कोपरगावकरांची आहे. त्यामुळे कोपरगावकर हि जबाबदारी नक्कीच पार पाडणार याची मला खात्री असून होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आ.आशुतोष काळेंना कोपरगावचे सुजाण मतदार भरभरून मतदान देवून आपली जबाबदारी पूर्ण करतील असा विश्वास माजी नगरसेवक मंदार पहाडे यांनी व्यक्त केला.