आ. आशुतोष काळेंच्या मागे खंबीरपणे उभा, महायुती शासनाचे सर्वोतोपरी सहकार्य राहील
कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव मतदार संघाचा मागील चार वर्षात झालेला विकास पाहता आ. आशुतोष काळे यांनी मतदार संघाच्या विकासाची केलेली कामगिरी उल्लेखनीय असून त्यांच्या रूपाने कोपरगाव मतदार संघाला उमदं, कर्तुत्वान, गतिमान नेतृत्व लाभले याचा कोपरगाव मतदार संघाच्या जनतेबरोबर मला देखील आनंद वाटत आहे असे गौरवोद्गार महसूल,पशु संवर्धन, दुग्ध विकास मंत्री तथा अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी काढले.
कोपरगाव तालुक्यातील माहेगाव देशमुख येथे आ. आशुतोष काळे यांच्या प्रयत्नांतून ४ कोटी रुपये निधीतून बांधण्यात आलेल्या नूतन प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीचे उद्घघाटन व जिल्ह्यातील शासकीय वाळू विक्री केंद्राचे उदघाटन महसूल, पशु संवर्धन, दुग्ध विकास मंत्री तथा अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते (ऑनलाईन पद्धतीने) आ.आशुतोष काळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले याप्रसंगी ना. विखे पाटील बोलत होते.ते पुढे म्हणाले की, आ.आशुतोष काळे यांच्या पुढाकारातून माहेगाव देशमुख प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत पूर्ण झाली त्याबद्ल त्यांचे अभिनंदन करतो. सर्वसामान्य नागरिकांना स्वस्तात वाळू उपलब्ध व्हावी यासाठी जिल्ह्यात आठ शासकीय वाळू डेपो सुरु होत आहे. अद्यापही या वाळू धोरणात पूर्णपणे पारदर्शकता आली नसल्याची खंत व्यक्त करतांना भविष्यकाळात नवीन धोरनामध्ये पारदर्शकता आणण्याचा प्रयत्न करणार आहे.जास्तीत जास्त नागरिकांना या धोरणांचा लाभ मिळावा व घरकुल व सरकारी कामांसाठी मोफत वाळू उपलब्ध व्हावी हा यामागे उद्देश आहे. गोदावरीच्या आवर्तनाबाबत आ. आशुतोष काळेंचा आग्रह आहे त्यासाठी मागील काही दिवसांपासून ते माझ्या संपर्कात आहेत. त्याबाबत तातडीने नासिक पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेणार आहे. आ. आशुतोष काळे यांनी असेच न्यायविकासात्मक कामांसाठी पुढाकार ठेवल्यास कोपरगाव मतदार संघाचा कायापालट होण्यास वेळ लागणार नाही. त्यासाठी राज्य सरकारचे जे काही सहकार्य आ.आशुतोष काळे यांना लागेल ते त्यांच्या मागे खंबीरपणे उभे करून त्यांच्या सर्व योजना पूर्ण करणार असल्याची ग्वाही ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी यावेळी दिली.
यावेळी आ.आशुतोष काळे म्हणाले की, कोरोना महामारीने आरोग्य व्यवस्था किती तोकड्या होत्या हे सिद्ध झाल्यामुळे मतदार संघाची आरोग्य व्यवस्था सक्षम करण्यावर भर दिला. कोपरगाव उपजिल्हा रुग्णालयाचे श्रेणीवर्धन व्हावे यासाठी पाठपुरावा करून १०० बेडच्या उपजिल्हा रुग्णालयास मंजुरी मिळवून २८.८४ कोटी निधी मंजूर करून आणला. माहेगाव देशमुख प्राथमिक आरोग्य केंद्र इमारतीसाठी ४ कोटी, संवत्सर ३० बेडचे ग्रामीण रुग्णालय व कर्मचारी वसाहतीसाठी २२.७८ कोटी व तिळवणी प्राथमिक आरोग्य केंद्रास मंजुरी मिळावी यासाठी प्रस्ताव दाखल केला असल्याचे सांगितले.
मतदार संघात पर्जन्यमान कमी झाल्यामुळे आवर्तनाची गरज भासत आहे.त्यासाठी पालकमंत्री ना.विखे साहेबांकडे मागणी केल्यामुळे लवकर आवर्तन देण्याचा त्यांनी शब्द दिला आहे. निवडून आल्यापासून कोपरगाव मतदार संघात एमआयडीसी व्हावी यासाठी पाठपुरावा करीत होतो. त्यासाठी तात्कालीन उद्योगमंत्री ना.सुभाष देसाई, राज्यमंत्री ना.आदितीताई तटकरे व विद्यमान उद्योगमंत्री ना. उदयजी सामंत यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला आहे. त्या पाठपुराव्याला पालकमंत्री ना. विखे पाटलांचा रेटा मिळाल्यामुळे कोपरगाव मतदार संघातील सोनेवाडी, चांदेकसारे भागातील शेती महामंडळाच्या जागेत एमआयडीसी उभारण्याचा निर्णय महायुती शासनाने घेतला आहे. कोपरगाव, शिर्डीचा अत्यंत महत्वाचा एमआयडीसीचा प्रश्न ना. विखे साहेबांमुळे मार्गी लागला आहे. मात्र काही व्यक्ती काडीचा सबंध नसतांना पत्रकार परिषद घेवून, बातम्या देवून श्रेय घेण्याचा प्रयत्न करीत आहे व आपला सत्कार करून घेत आहे.खोट्या बातम्या द्यायच्या, खोट्या मुलाखती द्यायच्या असा सध्या कार्यक्रम सुरु आहे. हि त्यांची परंपरा असून खोटे बोल पण रेटून बोल हि परंपरा ते चालवीत असल्याचा टोला आ.आशुतोष काळे यांनी योगदान नसतांना एमआयडीसीचे श्रेय घेणाऱ्यांना यावेळी लगावला.याप्रसंगी जिरायती भागाला निळवंडे डाव्या कालव्याचे पाणी मिळवून देवून अतिरिक्त दीड टीएमसी पाणी मिळवून दिल्याबद्दल व मतदार संघात एमआयडीसी उभारण्यासाठी मंजुरी मिळविल्याबद्दल आ. आशुतोष काळे यांचा यावेळी नागरिकांच्यावतीने जाहीर सत्कार करण्यात आला.