महिलांना एसटी बस प्रवासात ५० टक्के सवलत;
कोपरगाव : शिंदे-फडणवीस सरकारने महिलांना एसटी बस प्रवासात सरसकट ५० टक्क्यांची सूट देण्याचा ऐतिहासिक व क्रांतिकारी निर्णय घेतला असून, या निर्णयाची अंमलबजावणीदेखील सुरू झाली आहे. भाजपच्या प्रदेश सचिव आणि माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे यांनी सरकारच्या या निर्णयाचे स्वागत करून आज कोपरगाव बसस्थानकावर महिलांसोबत आनंदोत्सव साजरा केला. स्वत: स्नेहलताताई कोल्हे यांनी ५० टक्के सवलतीच्या दरात कोपरगाव-संगमनेर एसटी बसमधून इतर प्रवाशांसोबत प्रवास केला.
उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ९ मार्च रोजी राज्याचा सन २०२३-२४ चा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात त्यांनी महिलांना एसटीच्या सर्व प्रकारच्या बसेसच्या तिकीट दरात ५० टक्के सवलत देण्याची घोषणा केली होती. फडणवीस यांनी ही घोषणा केल्यानंतर त्याची १७ मार्चपासून अंमलबजावणीदेखील सुरू झाली आहे. शिंदे-फडणवीस सरकारने महिलांना एसटी बसच्या प्रवासभाड्यात सरसकट 50 टक्के सवलत देण्याचा निर्णय घेतल्याबद्दल सोमवारी (२० मार्च) कोपरगाव येथील एसटी बसस्थानकावर भाजपच्या प्रदेश सचिव व माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली भाजप-शिवसेना (शिंदे गट) युतीच्या वतीने आनंदोत्सव साजरा करण्यात आला. नारी शक्तीचा विजय असो, शिंदे-फडणवीस सरकारचा विजय असो, ५० टक्के-एकदम ओके, भाजप-शिवसेना युती सरकारचा विजय असो, स्नेहलताताई कोल्हे आगे बढो, हम तुम्हारे साथ है अशा घोषणा यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी दिल्या.
शिंदे-फडणवीस सरकारने महिलांना एसटी बस प्रवासात सरसकट ५० टक्के सवलत देण्याचा निर्णय घेऊन महिलांचा सन्मानच केला आहे. या निर्णयामुळे महिलांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे, असे सांगून स्नेहलताताई कोल्हे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे या निर्णयाबद्दल आभार मानले. महिलांनी मोठ्या प्रमाणात या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
याप्रसंगी स्नेहलताताई कोल्हे यांनी एसटी बसमधून प्रवास करणाऱ्या नायब तहसीलदार श्रीमती गोरे, वयोवृद्ध महिला मीनाबाई अंतराव भारूड (संवत्सर) यांच्यासह इतर महिला व मुलींना गुलाब पुष्प व पेढे देऊन त्यांच्यासोबत आनंद साजरा केला. महिलांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी त्यांनी जाणून घेतल्या. यावेळी भाजप महिला मोर्चाच्या शहराध्यक्षा वैशालीताई आढाव, शिवसेना शिंदे गटाच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष विमलताई पुंडे, माजी नगरसेवक अशोकराव लकारे, विद्याताई सोनवणे, शिल्पाताई रोहमारे, विजयाताई देवकर, हर्षाताई कांबळे, नंदाताई भंडारी अनिताताई साळवे, मीनाताई भारूड, सविताताई परदेशी, सुरेखाताई आवारे भाजपचे तालुकाध्यक्ष साहेबराव रोहम, शहराध्यक्ष दत्तात्रय काले, भाजयुमोचे तालुकाध्यक्ष विक्रम पाचोरे, शहराध्यक्ष अविनाश पाठक, विनोद राक्षे, दीपक चौधरी, भाजपचे शहर सरचिटणीस जयेश बडवे, अंबादास पाटोळे, किसनराव गव्हाळे, सिद्धांत सोनवणे, आदींसह भाजप, भाजयुमो, शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, एसटी महामंडळाचे अधिकारी, कर्मचारी व प्रवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बसस्थानक स्वच्छ ठेवून प्रवाशांना चांगल्या सुविधा द्या -स्नेहलताताई कोल्हे
या कार्यक्रमाच्या निमित्ताने कोपरगाव बसस्थानकावर आलेल्या स्नेहलताताई कोल्हे यांनी बसस्थानक परिसरातील अस्वच्छता पाहून तीव्र नाराजी व्यक्त केली. बसस्थानक परिसर स्वच्छ ठेवण्याची सूचना त्यांनी कोपरगाव आगाराचे व्यवस्थापक अविनाश गायकवाड यांना केली. कोल्हे यांनी केलेल्या या सूचनेची ताबडतोब दखल घेऊन लगेच बसस्थानक व परिसरातील केरकचरा काढून साफसफाई करण्यात आली.
ऐतिहासिक निर्णयामुळे महिलांनी मानले शिंदे-फडणवीस सरकारचे आभार
शिंदे-फडणवीस सरकारने एसटी बसच्या प्रवासभाड्यात महिलांना ५० टक्के सवलत देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे महिलांना आता अर्ध्या तिकिटात प्रवास करण्याची संधी मिळाली आहे. हा निर्णय आम्हा महिलांसाठी खूपच फायद्याचा ठरला आहे, अशा प्रतिक्रिया यावेळी महिला व विद्यार्थिनींनी व्यक्त करून शिंदे-फडणवीस सरकारचे आभार मानले.