कोपरगावात स्नेहलताताई कोल्हे, विवेक कोल्हे यांच्यासह संत, महंतांच्या उपस्थितीत श्रीराम मंगल अक्षता कलशाची भव्य शोभायात्रा

0

कोपरगाव : उत्तर प्रदेशातील अयोध्या येथील श्रीराम मंदिराचा लोकार्पण व प्रभू श्रीराम मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व अनेक साधू-संत, महंतांच्या उपस्थितीत २२ जानेवारी २०२४ रोजी होणार असून, त्यानिमित्त श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट, अयोध्या येथून निमंत्रणरुपी आलेल्या मंगल अक्षता कलशाची संत, महंतांच्या प्रमुख उपस्थितीत गुरुवारी (२१ डिसेंबर) कोपरगाव शहरातून वाजतगाजत भव्य शोभायात्रा काढण्यात आली. विश्व हिंदू परिषद, बजरंग दल तसेच इतर हिंदुत्ववादी संघटना व सकल हिंदू समाजाच्या वतीने आयोजित केलेल्या या शोभायात्रेत माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे व सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांनी सहभाग नोंदवला. डोक्यावर मंगल अक्षता कलश घेऊन मिरवणुकीत सहभागी झालेल्या स्नेहलताताई कोल्हे यांनी महिलांसोबत फुगडी खेळली. 

 यावेळी ‘जय श्रीराम’ च्या गजराने संपूर्ण कोपरगाव शहर दुमदुमून गेले होते. 

श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट, अयोध्या येथून आणलेल्या मंगल अक्षता कलशाचे गुरुवारी दुपारी कोपरगाव शहरातील श्री वरद विनायक व श्री दत्त मंदिरात पूजन करण्यात आले. त्यानंतर शोभायात्रेला सुरुवात झाली. स्नेहलताताई कोल्हे यांनी भगवान श्रीरामाचे व मंगल अक्षता कलशाचे पूजन करून अन्य सुवासिनी महिलांसमवेत डोक्यावर मंगल अक्षता कलश घेऊन शोभायात्रेत सहभाग नोंदवला. त्यांनी या महिलांसोबत फुगडी खेळून आपला आनंद व्यक्त केला. ही शोभायात्रा अहिंसा स्तंभाजवळ आल्यानंतर युवा नेते विवेकभैय्या कोल्हे यांनी त्यात सहभागी होऊन भगवा ध्वज फडकावत नृत्य केले. ‘श्रीराम जय राम जय जय राम’ असा जयघोष करीत भगव्या ध्वजासह टाळ, मृदंग, झांज, चौघडा व ढोल-ताशांच्या गजरात निघालेल्या या शोभायात्रेत अग्रभागी सजवलेल्या ट्रॅक्टरमध्ये प्रभू श्रीराम, सीता व लक्ष्मण यांची प्रतिमा ठेवलेली होती. शोभायात्रेत राष्ट्रसंत जनार्दन स्वामी (मौनगिरी) महाराज आश्रमाचे मठाधिपती प.पू. रमेशगिरी महाराज, प.पू. राघवेश्वरानंदगिरी ऊर्फ उंडे महाराज, प.पू. कैलासानंदगिरी महाराज, आत्मा मालिक ध्यानपीठातील संत निजानंद महाराज, विवेकानंद महाराज, राजानंद महाराज, चंद्रानंद महाराज, राजयोगिनी ब्रह्मकुमारी सरलादीदी, कोपरगाव गुरुद्वाराचे मुख्य ग्रंथी बाबा हरजितसिंग आदी संत, महंत सजवलेल्या रथात विराजमान झाले होते. शोभायात्रेत प्रभू श्रीराम, सीता व लक्ष्मण यांच्या वेशभूषेत सहभागी झालेल्या बालकलावंतांनी तसेच चित्तथरारक खेळ सादर करणाऱ्या मुला-मुलींनी नागरिकांचे लक्ष वेधून घेतले होते. शोभायात्रेच्या मार्गावर ठिकठिकाणी महिलांनी रांगोळ्या काढून, औक्षण करत अक्षता कलशाचे स्वागत केले. अक्षता कलशाचे दर्शन घेण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. शोभायात्रेदरम्यान फटाक्यांची आतषबाजी व फुलांची उधळण करण्यात आली. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here