१७ पैकी १२ ग्रामपंचायतीची सत्ता आ. आशुतोष काळे गटाकडे
कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव तालुक्यात पार पडलेल्या एकूण १७ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत काळे गटाने कोल्हे गटाचा धुव्वा उडवत आपल्या ताब्यातील ग्रामपंचायतीची सत्ता आबाधित ठेवत तब्बल १२ ग्रामपंचायतीची सत्ता हस्तगत करून या ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीचा झेंडा रोवला आहे.तर कोल्हे गटाला फक्त तीन ग्रामपंचायतीची सत्ता मिळाली असून एक ग्रामपंचायत औताडे गटाला तर एका ग्रामपंचायतीची सत्ता अपक्षांच्या हाती गेली आहे.
माजी आमदार अशोकराव काळे व आ. आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या १७ ग्रामपंचायती पैकी काळे गटाने आपले बुरुज शाबूत ठेवून मोठ्या मताधिक्क्याने विजय मिळविला त्याचबरोबर कोल्हे गटाच्या ताब्यातील सात ग्रामपंचायतीची सत्ता काबीज केली आहे.आ. आशुतोष काळे यांनी हजारो कोटीच्या निधीतून रस्ते, पाणी, आरोग्य,वीज या मुलभूत गरजा सोडवून केलेला विकास तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचला असल्याचे या निकालावरून सिद्ध होत आहे.पोहेगाव ग्रामपंचायतीची सत्ता देखील अतिशय थोडक्या मतांवरून गेली असून याठिकाणी कोल्हे-औताडे युती असून देखील काळे गटाचे सरपंचपद अवघ्या ६७ मतांनी गेले आहे. याठिकाणी काळे गटाने कोल्हे-औताडे युतीला टक्कर देवून आपल्या मताधिक्यात वाढ करतांना मागील वेळी असलेली तीन सदस्य संख्या देखील दुप्पट केली असून हि संख्या आता सहा झाली आहे.
आ.आशुतोष काळे यांनी विकासाचे जे स्वप्न जनतेला दाखविले ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी पाठपुरावा करून मागील अनेक दशकांपासून प्रलंबित असलेले प्रश्न देखील सोडविले आहेत. यामध्ये पूर्व भागातील वारी-कान्हेगाव येथील गोदावरी नदीचा पुलाचा प्रश्न सोडवून त्यासाठी २२ कोटी निधी देवून हे काम प्रगतीपथावर आहे. त्यामुळे वारी-कान्हेगावसह पंचक्रोशीतील गावातील नागरिकांची मोठी अडचण दूर झाल्यामुळे मतदारांनी काळे गटाच्या झोळीत भरभरून मतदान करून पूर्व भागातील अनेक ग्रामपंचायतींची सत्ता काळे गटाच्या ताब्यात दिल्यामुळे आ. आशुतोष काळे गटाची पूर्व भागातील ताकद निश्चीतपणे वाढली असून त्यामुळे येणाऱ्या निवडणुका काळे गटासाठी सोप्या झाल्या आहे. या यशामुळे मतदार संघाच्या विकासासाठी यापेक्षाही जास्त निधी आणण्यासाठी आ. आशुतोष काळे यांना बळ मिळाले आहे. सर्व विजयी उमेदवारांचे माजी आमदार अशोकराव काळे, आ.आशुतोष काळे यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. त्याचबरोबर पराभूत झालेल्या उमेदवारांना देखील खचून न जाण्याचा सल्ला देत तुम्ही सुद्धा या यशाचे वाटेकरी असल्याचे आ. आशुतोष काळे यांनी म्हटले आहे.
आ. आशुतोष काळेंनी घेतला निळवंडे कालव्याचा आढावा –
चौकट :- कोणताही राजकीय पक्ष किंवा राजकीय नेत्याला ग्रामपंचायतीच्या निकालाची उत्सुकता असते. मात्र कोपरगावात ग्रामपंचायतीच्या मतांची मतमोजणी सुरु असतांना आ. आशुतोष काळे मात्र निळवंडे कालव्याचा आढावा घेण्यासाठी गेले होते.मागील आठवड्यात निळवंडे कालव्याला पाणी सोडण्यात आले असून लाभक्षेत्रातील सर्व गावातील पाणी पुरवठा करणारे सर्व साठवण तलाव पूर्ण क्षमतेने भरून देण्याच्या सूचना त्यांनी पाटबंधारेच्या अधिकाऱ्यांना दिल्या. जनतेला विकास पाहिजे त्यामुळे १७ पैकी १२ ग्रामपंचायतीवर मिळालेला विजय अपेक्षितच होता कारण मतदार संघातील जनता माझ्या सोबत असल्याचे आ. आशुतोष काळे यांनी निकालावर प्रतिक्रिया देतांना सांगितले.