कोपरगाव मतदारसंघातील दहा गावात सौर ऊर्जा सबस्टेशन्सला मंजुरी – आ.आशुतोष काळे

0

 कोळपेवाडी वार्ताहर-कोपरगाव मतदार संघातील शेतकरी व वीज ग्राहकांच्या विजेच्या समस्या निवारण करण्यासाठी सौर उर्जा सबस्टेशनची निर्मिती करावी यासाठी करीत असलेल्या पाठपुराव्यातून कोपरगाव मतदार संघातील दहा गावांमध्ये सौर उर्जा सबस्टेशनला मंजुरी देण्यात आली असल्याची माहिती आ.आशुतोष काळे यांनी दिली आहे. 

रात्रीच्या वेळी शेत पिकांना पाणी भरण्यासाठी येत असलेल्या अडचणीमुळे वीज पंपासाठी दिवसा वीज मिळावी अशी मागणी शेतकर्‍यांनी आ.आशुतोष काळे यांच्याकडे केली होती. हि मागणी पूर्ण करण्यासाठी कोपरगाव मतदार संघात सौर उर्जा सबस्टेशनच्या निर्मितीसाठी आ.आशुतोष काळे यांच्या पाठपुराव्याची दखल घेवून उर्जा विभागाने कोपरगाव मतदार संघातील धोंडेवाडी, भोजडे, मळेगाव थडी, वडगाव, धामोरी, येसगाव, नाटेगाव, काकडी चांदगव्हाण, मुर्शतपूर या दहा गावातील एकूण ३७.५३ हेक्टर क्षेत्रात सौर ऊर्जा निर्मिती सबस्टेशन उभारण्यासाठी मंजुरी दिली आहे. यामध्ये सात गावातील क्षेत्र व त्यांची क्षमता पुढीलप्रमाणे असून यामध्ये धोंडेवाडी येथील २.१८ हेक्टर क्षेत्र व क्षमता ११.०६ एम.डब्लू, भोजडे २.१८ हेक्टर क्षेत्र क्षमता ६.५७ एम. डब्लू,मळेगाव थडी ४.९३ हेक्टर क्षेत्र व क्षमता १०.२७ एम.डब्लू, वडगाव १० हेक्टर क्षेत्र व क्षमता ७ एम.डब्लू, धामोरी ८ हेक्टर क्षेत्र क्षमता ७ एम.डब्लू, येसगाव २.४६ हेक्टर क्षेत्र व क्षमता ५.३७ एम.डब्लू, नाटेगाव ६ हेक्टर क्षेत्र व क्षमता  ५.३७, काकडी ३.९६ हेक्टर क्षेत्र व क्षमता १.७८ एम.डब्लू, चांदगव्हान ८.७७ हेक्टर क्षेत्र व क्षमता २१.६६ एम.डब्लू, मुर्शतपूर २.२५ हेक्टर क्षेत्र व क्षमता ५.५६ एम.डब्लू, अशा दहा गावात एकूण जवळपास ५१.२१ हेक्टर क्षेत्रावर हे सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प उभारले जाणार आहे. त्याबद्दल आ.आशुतोष काळे यांनी मतदार संघातील जनतेच्या वतीने राज्याचे मुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री ना.देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री ना.अजितदादा पवार,उपमुख्यमंत्री ना.एकनाथजी शिंदे यांचे आभार मानले आहे.

बिबट्याची दहशत असतांना व अंधारात सर्प दंश होण्याची भीती असतांना देखील शेतकरी रात्रीच्या वेळी जीव धोक्यात घालून शेतात पिकांना पाणी भरण्यासाठी जातात.शेतकऱ्यांना अशा जीवघेण्या अडचणीतून बाहेर काढण्यासाठी सौर उर्जा सबस्टेशन मोलाची भूमिका बजावणार असून शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळणार आहे. सौर उर्जेद्वारे नैसर्गिकरित्या स्रोतांचा वापर वाढविणे हे पर्यावरणीय दृष्ट्या फायदेशीर ठरणार आहे. सौर उर्जा सबस्टेशन म्हणजेच सौर उर्जेचा वापर करून कृषी क्षेत्रासाठी स्थिर व विश्वासार्ह वीजपुरवठा करण्याचा एक महत्त्वपूर्ण पर्याय आहे.महायुती सरकारने शेतकऱ्यांसाठी सौर उर्जा सबस्टेशन्स स्थापित करण्याच्या योजनेला गती दिली असून यामध्ये कोपरगाव मतदार संघाचा देखील समावेश आहे. कोपरगाव मतदार संघातील शेतकऱ्यांच्या वीजपुरवठ्याच्या समस्या दूर होण्यात सौर उर्जा सबस्टेशन्स महत्वाची भूमिका बजावणार असून त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंता निश्चितपणे कमी होणार आहेत असा विश्वास आ.आशुतोष काळे यांनी व्यक्त केला आहे .

सौर उर्जा सबस्टेशन्समुळे शेतकऱ्यांचे जीवन अधिक सोयीस्कर व सुकर होईल आणि त्यांच्या शेतीचे उत्पादन वाढवण्यासाठी आवश्यक असलेली वीज अखंडितपणे सहज उपलब्ध होईल. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंता मोठ्या प्रमाणावर कमी होतील. सौर उर्जेचा वापर पर्यावरणीय दृष्टीनेही लाभदायक व निसर्गपूरक आहे. शेतकऱ्यांना सौर सबस्टेशनच्या माध्यमातून शेती वीज पंपासाठी वीज उपलब्ध होवून शेतकऱ्यांचे जीवन अधिक सोयीस्कर व सुखकर होण्यास खूप मदत होणार आहे. कोपरगाव मतदार संघातील धोंडेवाडी, भोजडे, मळेगाव थडी, वडगाव, धामोरी, येसगाव, नाटेगाव, काकडी चांदगव्हाण, मुर्शतपूर या दहा गावातील व परिसरातील शेतकऱ्यांनी आ.आशुतोष काळे यांचे आभार मानले आहे. मतदार संघातील इतरही गावातील सौर उर्जा सबस्टेशन उभारणीसाठी पाठपुरावा सुरु असून लवकरच इतर गावात देखील सौर उर्जा सबस्टेशन उभारले जाणार असल्याचे आ. आशुतोष काळे यांनी सांगितले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here