कोळपेवाडी वार्ताहर- जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत केलेल्या मागण्यांची दखल घेवून कोपरगाव विधानसभा मतदार संघातील श्री राजा विरभद्र देवस्थान भोजडे, श्री महादेव मंदिर देवस्थान डाऊच खु. व श्री महादेव मंदिर देवस्थान सडे या देवस्थानास तीर्थक्षेत्र ‘क’ वर्ग दर्जा मंजूर करण्यात आला असून वारी व संवत्सर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी प्रत्येकी एक रुग्णवाहिका मंजुर करण्यात आली असल्याची माहिती आ.आशुतोष काळे यांनी दिली आहे.
राज्याचे जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पा. यांच्या अध्यक्षतेखाली शनिवार (दि.०१) रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली. या बैठकीत आ.आशुतोष काळे यांनी पालकमंत्र्यांकडे मतदार संघाच्या विविध विकास कामांबरोबरच मतदार संघाच्या समस्यांकडे पालकमंत्र्यांचे लक्ष वेधून मतदार संघातील विविध देवस्थानांना क वर्ग दर्जा मिळावा अशी मागणी केली. तसेच मतदार संघातील उर्जा विभागाच्या समस्या मांडल्या. शेतकऱ्यांबरोबरच छोटे-मोठे व्यावसायिक वीज ग्राहकांना येणाऱ्या विजेच्या समस्या तातडीने दूर कराव्यात व आरोग्य विभागासाठी रुग्णवाहिका मिळाव्यात अशी मागणी केली.
या मागण्यांची दखल घेऊन पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे पा.यांनी श्री राजा विरभद्र देवस्थान भोजडे, श्री महादेव मंदिर देवस्थान डाऊच खुर्द व श्री महादेव मंदिर देवस्थान सडे या देवस्थानास तीर्थक्षेत्र ‘क’ वर्ग दर्जा मंजूर करून उर्जा विभागाच्या समस्या दूर करण्यात येतील अशी ग्वाही देवून कोपरगाव मतदार संघाच्या पूर्व भागातील वारी व संवत्सर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी प्रत्येकी एक रुग्णवाहिका मंजुर केली असल्याची माहिती आ.आशुतोष काळे यांनी दिली आहे.
आ.आशुतोष काळे यांच्या प्रयत्नांतून मागील पंचवार्षिकमध्ये श्री.क्षेत्र मयुरेश्वर देवस्थान पोहेगाव, श्री.लक्ष्मीमाता मंदिर देवस्थान कोकमठाण, श्री क्षेत्र रामेश्वर देवस्थान वारी, श्री क्षेत्र महेश्वर देवस्थान कोळपेवाडी, श्री क्षेत्र अमृतेश्वर देवस्थान माहेगाव देशमुख, श्री जगदंबा माता मंदिर देवस्थान ब्राम्हणगाव आदी देवस्थानांना ‘क’वर्ग दर्जा मिळवून दिला आहे. त्यामुळे या देवस्थानांचा विकास होण्यास मोठी मदत झाली असून भविष्यात अधिकचा विकास होवून भाविकांच्या अडचणी दूर होण्यास मदत होणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. मतदार संघातील श्री राजा विरभद्र देवस्थान भोजडे, श्री महादेव मंदिर देवस्थान सडे व श्री महादेव मंदिर देवस्थान डाऊच खु., या देवस्थानास तीर्थक्षेत्र ‘क’ वर्ग दर्जा मंजूर करण्यात आल्यामुळे भोजडे, डाऊच खु. व सडे येथील ग्रामस्थांबरोबरच भाविकांनी आ.आशुतोष काळे यांचे आभार मानले आहे.