माजी नगराध्यक्षासह १७ जणांना घेतला चावा
कोपरगाव प्रतिनिधी : कोपरगाव शहरातील गजानननगर या उपनगर आणि परिसरामध्ये १५ एप्रिल रोजी दिवसभर एका पिसाळलेल्या एका कुत्र्याने अक्षरशः धुमाकूळ घातला होता . यावेळी या पिसाळलेल्या कुत्र्याने माजी नगराध्यक्षासह १७ जणांना घेत गंभीर जखमी केले. या कुत्र्याच्या हल्ल्यामध्ये एका तीन वर्षाच्या मुली पासून ते ज्येष्ठांपर्यंत नागरिकांचा समावेश आहे. या घटनेने शहर परिसरात खळबळ उडाली असून प्रचंड भीतीचे वातावरण पसरले होते.
या घटनेमुळे नागरिकांमध्ये नगरपालिका प्रशासनाच्या विरोधात मोठा असंतोष पसरला आहे. कुत्र्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्यांना कोपरगाव ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचारार्थ दाखल करण्यात होते. त्यांच्यावर प्राथमिक वैद्यकीय उपचार करून त्याना पुढील उपचारासाठी अहिल्यानगर येथील शासकीय रुग्णालयात संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिन दादा कोल्हे यांच्या मदतीने पाठवण्यात आले आहे. पिसाळलेल्या कुत्र्यामुळे परिसरात इतकी दहशत पसरली होती की, नागरिकांनी अक्षरश: घराचे दरवाजे लावून स्वताला कोंडून घेण्याची वेळ आली होती.
कोपरगाव शहरांमध्ये सध्या मोकाट जनावरांचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. या आधीही मोकाट कुत्र्यांनी लहान मोठ्यांना चावे घेऊन जखमी करण्याच्या अनेक घटना घडतच असतात . कुत्र्या प्रमाणे शहरामध्ये गायी, बैल,वळू या प्रकारच्या मोकाट जनावरांनी अक्षरशः थैमान घातले आहे. या मोकाट जनावरांच्या हल्ल्यामध्ये अनेक नागरिकांना गंभीर स्वरूपाच्या दुखापती ही झाल्या आहेत. तर काही शाळकरी विद्यार्थ्यांचा मृत्यूही झाला आहे. अनेकदा पालिकेत याबाबत निवेदन दत मोर्चा काढून देखील पालिका प्रशासनावर त्याचा फारसा प्रभाव होताना दिसत नाही.