पुरवा नष्ट करण्याच्या हेतूने मृतदेह दिला विहिरीत फेकुन
जामखेड तालुका प्रतिनिधी :
जामखेड तालुक्यातील खर्डा येथील जामखेड खर्डा रोडवर असलेल्या हाॅटेल पाटील येथील हॉटेल मध्ये काम करत असलेल्या कामगाराचा खून करून त्याचा मृतदेह पखरूड शिवारातील बेल्हेश्वर मंदिराच्या कमानी जवळील विहिरीत फेकून दिला व पुरावा नष्ट करण्याच्या प्रयत्न केला. अखेर दोनच दिवसात पोलिसांनी तपास करीत या खुनाचा प्रकार उघडकीस आणुन आरोपींना अटक करण्यात आली आहे.
पोलीसांनाकडुन मिळालेली माहिती अशी की जामखेड तालुक्यातील खर्डा येथिल जामखेड खर्डा रोडवर हॉटेल पाटील पॅलेस हे हॉटेल आहे. या ठीकाणी आठ ते दहा दिसांनपासुन यातील मयत अनिकेत संजय उदमले (वय २५) रा. आडगाव ता. पाथर्डी हा कामगार काम करत होता.
मयत अनिकेत संजय उदमले हा कामगार हॉटेल मालक यास दलित आहे हे माहीत असताना देखील त्यांनी अनिकेत यास हॉटेल मालक अक्षय कातोरे याने शिवीगाळ केली. तसेच यातील आरोपी अक्षय कातोरे व त्याचा कामगार भरत अगलावे या दोघांनी मिळून अनिकेत यास तंदूर भट्टीत टाकायची लाकडे हातात घेऊन मारहाण केली व तसेच तिसरा कामगार शुभम एडके याने अनिकेत यास लाथा बुक्क्याने मारहाण केली. त्या मारहाणीमध्ये अनिकेत याचा मृत्यू झाला. नेमके मारहाण करून खुन का केला याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. अनिकेत मयत झाला असल्याचे या तिघांच्या लक्षात येताच त्यांनी पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने अनिकेतचा मृतदेह एका ब्लॅंकेट मध्ये गुंडाळून मौजे पखरूड शिवारातील बेलेश्वर मंदिराचे कमानी जवळील विहिरीत फेकून दिला. सदरची घटना ही दि. १५ मे २०२३ रोजी जामखेड तालुक्यातील खर्डा येथील हॉटेल पाटील पॅलेस येथे व दि. १६ मे २०२३ दरम्यान रोजी सायंकाळी पूर्वी (वेळ निश्चित माहित नाही) पखरूड शिवारात घडली आहे.
यानुसार मयत अनिकेतचे वडील संजय विठोबा उदमले वय ४८ व्यवसाय, शेती. रा. आडगाव ता. पाथर्डी. जि अहमदनगर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तसेच वरिष्ठांच्या आदेशाने अक्षय हनुमंत कातोरे रा खर्डा, भरत अगलावे रा.ब्रह्मगाव ता. आष्टी, शुभम येकडे राहणार बुलढाणा यांच्या विरूद्ध उस्मानाबाद जिल्ह्य़ातील वाशी पोलीस स्टेशन ला ॲट्रोसिटी व खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या नंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत दोन दिवसात या खुनाचा तपास करीत आरोपींना तत्काळ अटक करण्यात वाशी पोलीसांना यश आले आहे. यातील आरोपींनी गुन्हाची कबुली दिली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस अधीक्षक एम. रमेश. कळंब हे करीत आहेत. खर्डा पोलीस स्टेशनचे पोलीस नाईक संभाजी शेंडे पोलीस कॉन्स्टेबल शेषराव मस्के व बाळासाहेब खाडे, यांनी मयताची ओळख पटवून गुन्हा उघडकीस आणुन तपासामध्ये वाशी पोलीसांना मदत केली .
ही खूनाची घटना समजलेनंतर खर्डा व परिसरात एकच खळबळ उडाली आहे. खर्डा शहरात काही महिन्यांच्या अंतराने खुनाच्या घटना घडत असल्याने गुन्हेगारावर खर्डा पोलीसांचा वचक आहे का? असा प्रश्न नागरिक विचारत असून खर्डा पोलीस स्टेशनला एका खमक्या अधिकाऱ्याची नेमणूक करावी अशी मागणी खर्डा व खर्डा पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व सामान्य नागरिक करत आहेत.
चौकट
सदर खूनाची घटना खर्डा पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली असली तरी आरोपींनी पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने प्रेत उस्मानाबाद जिल्ह्य़ातील वाशी पोलीस स्टेशनच्या हद्दीत नेऊन टाकल्याने या घटनेचा तपास व कारवाई वाशी पोलीस करत आहेत.