अमृतसर: पंजाब पोलिसांनी शनिवारी (18 मार्च) ‘वारिस पंजाब दे’ संघटनेचा प्रमुख अमृतपाल सिंह आणि संघटनेच्या इतर सदस्यांविरोधात कारवाईचं राज्यव्यापी अभियान सुरू केलंय. पोलिसांच्या माहितीनुसार, अमृतपाल सिंह आतापर्यंत पोलिसांना सापडला नाही. मात्र, आतापर्यंत त्याच्या संघटनेच्या 78 जणांना अटक करण्यात आलीय.
इतर काही लोकांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलंय. या कारवाईदरम्यान पोलिसांनी 9 शस्त्रं जप्त केली. ज्यांच्यावर अनेक विविध प्रकारचे गुन्हे दाखल आहेत, त्यांच्यावरच कारवाई करत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
पोलिसांच्या कारवाईमुळे राज्यात अनेक ठिकाणी तणाव आहे. पोलिसांनी पंजाबमधील अनेक जिल्ह्यांमध्ये कलम-144 लागू केला असून, इंटरनेट आज (19 मार्च) दुपारपर्यंत बंद केलंय.
पोलिसांच्या कारवाईविरोधात काही ठिकाणी निदर्शनंही झाली. दुसरीकडे, पंजाबचे कॅबिनेट मंत्री बलबीर सिंह यांनी म्हटलं की, ही कारवाई कायद्यानेच होत आहे.
अमृतपाल सिंह ‘फरार’
पंजाब पोलिसांच्या प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी (18 मार्च) दुपारनंतर पोलिसांनी जालंधर जिल्ह्यातील शाहकोट मालसैन रोडवर ‘वरिस पंजाब दे’ संघटनेच्या काही कार्यकर्त्यांना पकडलं. यातल्या सातजणांना तिथेच अटक करण्यात आली. पोलीस प्रवक्त्यांनुसार, अमृतपाल सिंह याच्यासह अनेकजण पळाले आहेत. त्यांना पकडण्यासाठी व्यापक स्तरावर अभियान सुरू आहे.