खारघर दुर्घटनेप्रकरणी शिंदे-फडणवीसांविरुद्ध गुन्हा नोंदविण्याची मागणी करणारी याचिका

0

मुंबई : ‘नवी मुंबईतील खारघर येथे आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्याच्या सोहळ्यादरम्यान उष्माघाताने व चेंगराचेंगरीने 14 जणांचा मृत्यू झाला. याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अन्य संबंधित व्यक्तींचे ढिसाळ नियोजन कारणीभूत आहे. त्यामुळे त्यांच्याविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याचे निर्देश द्यावेत’, अशी मागणी करणारी याचिका सोमवारी (24 एप्रिल) उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली.

शैला कंथे यांनी अ‍ॅड. नितीन सातपुते यांच्यामार्फत ही याचिका केली असून या आठवड्यात किंवा 2 मे रोजी या प्रश्नी प्राथमिक सुनावणी होण्याची शक्यता आहे.

या याचिकेत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांबरोबरच आरोग्यमंत्री, पालकमंत्री, नवी मुंबई पोलिस आयुक्त, राज्याचे पोलिस महासंचालक, जिल्हाधिकारी, नवी मुंबई महापालिका आयुक्त, ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कारविजेते आप्पासाहेब धर्माधिकारी यांनाही प्रतिवादी करण्यात आले आहे.

‘प्रत्येक मृताच्या कुटुंबाला 50 लाख रुपयांची भरपाई व जखमींना पाच लाख रुपयांची भरपाई देण्याचे निर्देश सरकारला द्यावेत. तसेच याचिका निकाली निघेपर्यंत हीच अंतरिम भरपाई देण्याचे निर्देश द्यावेत’, अशी विनंतीही याचिकेत करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here