संगमनेर : अखिल भारतीय अंगणवाडी सेविका फेडरेशनच्या अहमदनगर जिल्ह्यातील ७२ अंगणवाडी सेविका त्यांच्या विविध मागण्यांसाठी दिल्ली येथे आल्या असता,खा.डॉ.सुजय विखे पाटील यांनी त्यांची केंद्रीय महिला व बालकल्याण मंत्री स्मृती इराणी यांची भेट घडवून आणली. या भेटीत अंगणवाडी सेविकांच्या विविध मागण्या संदर्भातले निवेदन केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी स्वीकारले.
यावेळी आपल्या मागण्या मंजूर करण्याबाबत या अंगणवाडी सेविकांनी त्यांच्याकडे आग्रह धरत लेखी निवेदन दिले, या अंगणवाडी सेविकाची मागणी रास्त असून बऱ्याच दिवसा पासून प्रलंबित आहे, त्यावर आपण सहानुभुती पूर्वक विचार करून त्यांना न्याय द्यावा अशी विनंती खा. डॉ सुजय विखे पाटील यांनी स्मृती इराणी यांच्या कडे केली. मंत्री स्मृती इराणी यांनी या मागण्या बाबत आपण सविस्तर माहिती घेवून निश्चित पूर्ण करण्याचा प्रयत्न करू असे आश्वासन दिले. दरम्यान थेट केंद्रीय महिला व बालकल्याण मंत्री स्मृती इराणी यांची भेट होऊन आपल्या मागण्या बाबत त्यांच्याशी चर्चा करता आली याबद्दल अंगणवाडी सेविका फेडरेशनच्या सेविकांनी खा.डॉ.सुजय विखे पाटील यांचे आभार मानले.