गुजरातच्या मुंद्रा बंदरात हजारो टन ड्रग्ज कसे येतात? – नाना पटोले

हजारो टन अंमली पदार्थ रोखू न शकणारे दोन चार ग्रॅम गांजावर मात्र मोठा आकांडतांडव करत होते

0
  • मुंबई : देशातील तरुणांमध्ये व्यसनाधीनतेचं प्रमाण वाढत चालल्याचं समोर आलं असून त्यावरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे .

‘गुजरातच्या मुंद्रा या खासगी बंदरात हजारो टन ड्रग्ज आल्याचं देशानं पाहिलं आहे. अशा घटना एकदाच नव्हे तर अनेकवेळा घडलेल्या आहेत. हे सगळं राजरोस कसं चालतं,’ असा खडा सवाल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला. ‘केंद्रात भाजपचं सरकार आल्यापासून ड्रग्जच्या तस्करीत वाढ झाली असून तरुण पिढी नशेखोर होत चालली आहे, असा आरोपही पटोले यांनी केला.

देशातील १० ते १७ वयोगटातील दीड कोटी मुले व्यसनाधीन असल्याचं प्रतिज्ञापत्र केंद्र सरकारनं सर्वोच्च न्यायालयात सादर केलं आहे. याचा संदर्भ देत नाना पटोले यांनी भाजपवर टीकेची जोरदार तोफ डागली आहे. ‘भारताकडं तरुणांचा देश म्हणून पाहिलं जातं. देशात १६ ते ४० वयोगटातील लोकसंख्या ५० टक्के आहे. ही तरुणपिढी देशाचं भवितव्य आहे. देशाचं भवितव्य असेलली ही पिढीच नशेखोर बनत आहे. केंद्रात भाजपचं सरकार आल्यापासून ड्रग्जच्या तस्करीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून ही परिस्थिती उद्धवली आहे, असा आरोप त्यांनी केला.

‘तरुण पिढी नशेच्या आहारी जाणं आपल्या देशाच्या भविष्यासाठी चांगले नाही. अंमली पदार्थांची तस्करी मागील काही वर्षात मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. गुजरातच्या मुंद्रा या खासगी बंदरात हजारो टन ड्रग्ज आल्याचं देशानं पाहिलं आहे, अशा घटना एकदाच घडलेल्या नसून अनेकवेळा घडलेल्या आहेत. जेएनपीटी बंदरातूनही अंमली पदार्थाचा साठा असलेला कंटनेर जप्त करण्यात आला होता. बेंगळुरूमध्येही तरुण पिढी नशेच्या आहारी गेल्याची घटना नुकतीच उघड झाली आहे. देशातील अंमली पदार्थांच्या तस्करीवर नियंत्रण मिळवण्यात केंद्र सरकारला अपयश आलं आहे, अशी टीका पटोले यांनी केली.

मुंबईत काही सेलिब्रिटींच्या घरी दोन-चार ग्रॅम गांजा सापडल्याचं भांडवल करून मुंबई म्हणजे नशेखोर लोकांचं शहर झाल्याचं चित्र निर्माण करण्याचं काम महाविकास आघाडी सरकारच्या काळात भाजप व त्यांच्या समर्थकांनी केलं होतं. हजारो टन अंमली पदार्थ रोखू न शकणारे दोन चार ग्रॅम गांजावर मात्र मोठा आकांडतांडव करत होते. देशात नशा करणारांची वाढती संख्या व त्यावर नियंत्रण मिळवण्यात येत असलेलं अपयश ही चिंतेची बाब आहे. राजकारणापेक्षा हा देशाच्या भविष्याचा प्रश्न असून केंद्र सरकारनं तातडीनं या प्रकरणात लक्ष घालून नशेच्या आहारी जात असलेल्या तरुण पिढीला त्यापासून परावृत्त करण्याचं काम करावं, असं पटोले म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here