गुरु पौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर वाहतुकीचे योग्य नियोजन करा

0

आ. आशुतोष काळेंच्या पोलीस प्रशासनाला सूचना

कोळपेवाडी वार्ताहर :- रविवार (दि.२१) रोजी गुरुपोर्णिमा असून दरवर्षी गुरुपोर्णिमेला कोपरगाव, कोकमठाण व शिर्डी येथे दर्शनाला जाणाऱ्या भाविकांची संख्या खूप मोठी असते. त्या पार्श्वभूमीवर भाविकांना कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही याची काळजी घेवून वाहतुकीचे योग्य नियोजन करा अशा सूचना आ.आशुतोष काळे यांनी पोलीस प्रशासनाला दिल्या आहेत.

दरवर्षी गुरुपोर्णिमेला शिर्डी येथील श्री साईबाबा मंदिर, कोपरगाव बेट भागातील राष्ट्रसंत जनार्दन स्वामी महाराज आश्रम व कोकमठाण येथील विश्वात्मक जंगलीदास महाराज आश्रम याठिकाणी विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. या कार्यक्रमासाठी देशासह राज्याच्या कानाकोपऱ्यातून मोठ्या संख्येने भाविक येत असतात. याहीवर्षी गुरुपोर्णिमा उत्सव रविवारी असून सुट्टीचा दिवस असल्यामुळे मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होणार आहे. अत्यंत महत्वाच्या असणाऱ्या सावळीविहीर फाटा-कोपरगाव रस्त्याचे काम प्रगतीपथावर असून येत्या काही महिन्यात हे काम पूर्ण होणार आहे. रस्त्याचे काम सुरु असले तरी बहुतांश ठिकाणी एकेरी वाहतूक सध्या योग्य पद्धतीने सुरु आहे.

शिर्डी येथील श्री साईबाबा मंदिर, कोपरगाव बेट भागातील राष्ट्रसंत जनार्दन स्वामी महाराज आश्रम व कोकमठाण येथील विश्वात्मक जंगलीदास महाराज आश्रम हे तीनही देवस्थान एकाच मार्गावर व चार ते पाच किलोमीटर अंतरावर असल्यामुळे कोपरगाव तालुक्यातून गुरुपौर्णिमेला असंख्य भाविक पायी चालत जातात तसेच राज्यातून अनेक पालख्या येत असतात. त्यामुळे गुरुपौर्णिमेला होणारी भाविकांची गर्दी पाहता निश्चितपणे वाहनांची संख्या या मार्गावर वाढणार आहे. वाढलेल्या वाहनांच्या संख्येचा भाविकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही व कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची पोलीस प्रशासनाने दक्षता घेवून वाहतुकीचे देखील योग्य नियोजन करावे अशा सूचना आ. आशुतोष काळे यांनी पोलीस प्रशासनाला दिल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here