नगर – नगर शहरातील गुलमोहोर रोड परिसरात पथदिवे बसविणे व रस्त्याचे अपुर्ण असलेले कामे पूर्ण करावेत, यामागणीचे निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने मनपा आयुक्त डॉ.पंकज जावळे यांना देण्यात आले. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष सचिन डफळ, उपशहराध्यक्ष तुषार हिरवे, महिला जिल्हाध्यक्ष अॅड.अनिता दिघे, वाहतुक सेनेचे शहराध्यक्ष अशोक दातरंगे,शहर सचिव डॉ.संतोष साळवे, उप शहराध्यक्ष महेश दांगट, विभाग अध्यक्ष महेश चव्हाण, किरण रोकडे, वंदना थोरवे, ओंकार बोराटे आदि उपस्थित होते.
आयुक्त यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सावेडी भागातील गुलमोहोर रस्त्याचे सुरु असलेले पथदवे मागील आठ महिन्यांपासून काढून ठेवले आहेत. संपूर्ण रस्त्यावर अंधारात असून, त्यामुळे चेन स्नेचिंग, चोर्या, अपघात अशा घटना वारंवार घडत आहेत. सुस्थितीत व सुरु असलेले पथदिवे काढण्यात जी तत्परता प्रशासनाने दाखवली तीच तत्परता पथदिवे पुर्ववत करण्यास न दाखवता गेल्या आठ महिन्यांपासून त्या कामास मुहूर्त लागेना
तसेच गुलमोहोर रस्त्याचे डांगरीकरणाची वर्क ऑर्डर साधारणत: मार्च 2021 मध्ये निधाली आणि डांबरीकरणाचा एक लेयर होण्यास तब्बल दीड वर्ष लागले म्हणून नोंव्हेंबर 2022 ला एक लेयर पूर्ण झाला. परंतु आज तागायत उर्वरित अंतिम लेयरचे काम दहा महिने उलटून गेले तरीही झालेले नाही. रस्त्याच्या पुढील लेयरचे काम न झाल्यामुळे जो एक लेयर झाला आहे, तोही खराब होण्यास सुरुवात झाली आहे. नागरिकांनी कर रुपी भरलेल्या पैशांची अक्षरक्ष: उधळण चाललेली दिसत आहे. प्रशासकीय अधिकार्यांनी रस्त्याचे जेवढे काम झाले आहे, त्या कामाचा दर्जा तपासून ऑडिट करावे. व काम योग्य पद्धतीने पूर्ण झाल्याशिवाय ठेकेदाराचे बिल अदा करु नये. प्रशासन व ठेकेदार यांच्यातील वादाचा त्रास सर्व नागरिकांना हाकनाक सहन करावा लागतोय.
या सर्वात आश्चर्याची बाब म्हणजे इतक्या महत्वाच्या विषयाबाबत या भागातील सर्व लोकप्रतिनिधी गप्प आहेत. या भागातील एकही प्रतिनिधी नागरिकांसाठी प्रशासन तसेच ठेकेदारास जाब विचारण्यास तयार नाही.असो नागरिकांवर होणार्या अन्यायासाठी व त्यांच्या मुलभूत गरजांसाठी नेहमीच महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्यांच्या पाठिशी उभी आहे, हे प्रशासनाने तसेच लोकप्रतिनिधींनी विसरु नये.
येत्या आठ दिवसात पथदिवे व अपुर्ण असलेल्या रस्त्याचे डांबरीकरणाचे काम सुरु न झाल्यास मनसेच्यावतीने नागरिकांसह आयुक्तांच्या दालनात व स्थानिक लोकप्रतिनिधींच्या घरासमोर आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही निवेदनात देण्यात आला आहे.