हजारो महिलांच्या उपस्थितीत गोदाकाठ महोत्सवाचे उद्घाटन संपन्न
दिंडीच्या रिंगणात आ.आशुतोष काळेंनी पत्नी सौ.चैतालीताई काळे समवेत फुगडीचा घेतला आनंद
कोळपेवाडी वार्ताहर – ऐतिहाहिक,पौराणिक वारसा असलेल्या कोपरगावच्या गोदाकाठी माजी आमदार अशोकराव काळे व आमदार आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण संस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्या गोदाकाठ महोत्सवातून बचत गटाच्या महिलांच्या अर्थकारणाला चालना मिळत असल्याचे प्रतिपादन गौतम सहकारी बँकेच्या माजी संचालिका व प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळाच्या अध्यक्षा मा.सौ. पुष्पाताई काळे यांनी केले.
प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळ आयोजित ‘गोदाकाठ महोत्सव २०२३’ चे उदघाटन गौतम सहकारी बँकेच्या माजी संचालिका व प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ. पुष्पाताई काळे यांच्या शुभहस्ते व आ. आशुतोष काळे व अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेच्या माजी संचालिका सौ.चैतालीताई काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले याप्रसंगी त्या बोलत होत्या.
त्या पुढे म्हणाल्या की, कोपरगावच्या पावन भूमीला गोदामाईने वळसा घालून आपल्या कवेत घेतले आहे. याच पावणभुमित मागील काही वर्षापासून बचत गटांच्या महिलांनी तयार केलेल्या मालाला हककाची बाजारपेठ निर्माण व्हावी व त्यांचा आर्थिक उत्कर्ष व्हावा या उद्देशातून मागील काही वर्षापासून गोदाकाठ महोत्सव सुरू करण्यात आला आहे. मागील दोन वर्ष वैश्विक कोरोना महामारीमुळे हा गोदाकाठ महोत्सव होवू शकला नाही. त्यामुळे बचत गटाच्या महिलांची काहीशी काळजी वाढली होती. त्यावेळी ज्या बचत गटाच्या महिलांनी नाममात्र शुल्क देवून स्टॉल बुकिंग केले होते त्यांना बुकिंगची रक्कम परत देवू केली असता सर्व बचत गटाच्या महिलांनी हि रक्कम घेतली नाही पुढच्या गोदाकाठ महोत्सवाच्या स्टॉल्सची बुकिंग समजून हि रक्कम तुमच्याकडेच ठेवा हा विश्वास गोदाकाठ महोत्सवाने कमविला आहे. दोन वर्षानंतर पुन्हा एकदा हा गोदाकाठ महोत्सव सुरु झाल्यामुळे बचत गटाच्या महिलांची काळजी दूर होवून त्यांना पुन्हा एकदा उभारी मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी आ.आशुतोष काळे म्हणाले की, प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळाच्या माध्यमातून सुरु करण्यात आलेल्या या गोदाकाठ महोत्सवाने आजवर हजारो बचत गटाच्या महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी महत्वाची भूमिका पार पाडली आहे आणि यापुढे देखील हि सामाजिक बांधिलकी जोपासण्याची जबाबदारी पार पाडणार असून गोदाकाठ महोत्सव बचत गटाच्या महिलांचा मुख्य आधारस्तंभ झाला असल्याचे त्यांनी सांगितले.
सौ. चैतालीताई काळे म्हणाल्या की, गोदाकाठ महोत्सवाची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत चालली आहे. २०२० ला गोदाकाठ महोत्सवाची पूर्ण तयारी प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळाने केली होती. मात्र कोविडच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या आदेशानुसार अचानकपणे गोदाकाठ महोत्सव रद्द करावा लागला. त्यामुळे मागील दोन वर्ष गोदाकाठ महोत्सव होवू शकला नाही. बचत गटाच्या महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्याचे व्रत हाती घेतलेल्या या गोदाकाठ महोत्सवाची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत असतांना २०२० ला २०० च्या आत असलेले बचत गटाच्या महिलांच्या स्टॉल्सची संख्या ३०० पर्यंत जावून पोहोचली असून यावरून गोदाकाठ महोत्सवाने घेतलेल्या भरारीतून निश्चितपणे बचत गटाच्या महिलांची आर्थिक प्रगती झाल्याचे अधोरेखित होत असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी विविध शाळांच्या विद्यार्थ्यांनी श्री छत्रपती शिवाजी महाराज स्मारकापासून कोपरगाव शहरात बालवारकऱ्यांची दिंडी,रायरेश्वर मंदिरात छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेची केलेली प्रतिज्ञा,झांज पथक, वासुदेव गीत, तीन पावरी नृत्य, बांबूवरील नृत्य तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रम दाखवून उपस्थिता हजारो नागरिकांना मंत्रमुग्ध केले. सजवलेल्या बैलगाडीतून सामाजिक क्षेत्रात योगदान देणाऱ्या महिला मंडळाची काढण्यात आलेली भव्य, दिव्य मिरवणुकीने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.
यावेळी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष, संचालक, संलग्न संस्थांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक, महात्मा गांधी जिल्हा प्रदर्शन चॅरिटेबल ट्रस्टचे पदाधिकारी, माजी जिल्हा परिषद-पंचायत समिती सदस्य, माजी नगरसेवक, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, महिला मंडळांच्या सदस्या, शासकीय अधिकारी, विविध क्षेत्रातील मान्यवर, नागरिक आदी उपस्थित होते.
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारक येथे बालवारकऱ्यांची दिंडी आली असता त्या ठिकाणी भजनानंदी रंगलेल्या उभ्या गोल रिंगणात आ.आशुतोष काळे व सौ.चैतालीताई काळे यांनी देखील बालवारकऱ्यांसमवेत हरिनामात दंग होवून वारकरी फुगडी खेळण्याचा आनंद लुटून ब्रम्हानंदाची अनुभूती घेतली.