कोपरगाव प्रतिनिधी :
कोपरगाव तालुक्यातील सोनेवाडी परिसरात शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये गहू कांदा व हरभरा पिकांचे मोठ्या प्रमाणात लागवड केली आहे. गेल्या दोन महिन्यापासून गोदावरी कालवा बंद असल्याने परिसरातील पाणी पातळीत मोठी घट झाली आहे. शेतकऱ्यांनी रब्बी हंगामासाठी सात नंबर फार्म देखील भरलेले आहे. मात्र अजूनही गोदावरी कालवा वाहता झाला नाही. त्यामुळे नाशिक पाटबंधारे विभागाने तातडीने गोदावरी उजव्या कालव्याला पाणी सोडावे याची मागणी सोनेवाडी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.
खरिपाचे पिके सोंगणी झाल्यानंतर शेतकऱ्यांनी रब्बी हंगामासाठी पिके करण्याचा निर्णय घेतला. गोदावरी उजव्या कालव्याच्या लाभ क्षेत्रात असलेल्या शेतकऱ्यांना हरभरा व गहू पिकासाठी हक्काचे आवर्तन मिळते. त्यामुळे या परिसरात शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात गहू हरभरा मका व कांदा अदी पिकांची लागवड केली आहे.
सध्या परिसरातील विहिरींच्या पाणी पातळीत घट झाली असून शेतकऱ्यांना आता आपली पिके जगण्यासाठी मोठे कष्ट घ्यावे लागत आहे. त्यामुळे गोदावरी कालव्याला तातडीने पाणी सोडावे अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.