पोहेगांव (वार्ताहर) कोपरगाव तालुक्यात सध्या गोदावरी कालव्यामार्फत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची पाण्याची तळे भरण्याचे काम चालू आहे. गोदावरी कालव्यांना सध्या जे आवर्तन सोडलेले त्या आवर्तनात पूर्ण पणे मळी मिश्रित काळे पाणी असल्याने ते थेट पिण्याच्या पाण्याच्या तळ्यात सोडले जात आहे मात्र या पाण्याचा गाव गावच्या ग्रामस्थांच्या आरोग्यावर मोठा परिणाम होऊ शकतो मळी मिश्रित पाण्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते असे डाऊच खुर्द ग्रामपंचायतचे माजी सरपंच संजय गुरसळ यांनी सांगितले.
गावातील पाणीपुरवठा करणाऱ्या समृद्धी महामार्गा कडून नवीनच झालेल्या तळ्याच्या संदर्भात पाणी सुटले असल्याचे लक्षात येताच पाहाणी करत पाटबंधारे विभागाच्या गलथान कारभारावर त्यांनी ताशेरे ओढले.या पाण्याची पहाणी करून त्यांनी सरपंच नेहा गुरसळ, उपसरपंच रईस सय्यद ग्रामपंचायतचे सर्व सदस्य व ग्रामसेवक जालिंदर पाडेकर यांना या संदर्भात माहिती दिली. गोदावरी कालव्यात मळी मिश्रित पाणी येत असल्याची बाब अत्यंत दुर्देवी असल्याचे त्यांनी सांगितले.या पाण्याचे शुद्धीकरण करण्यासाठी ग्रामपंचायतीने विशेष लक्ष केंद्रित केले आहे . टी सी एल व तुरटी चा वापर करत वास कमी करण्याचा प्रयत्न केला. नागरिकांनी पाणी उकळून व गाळून घ्यावे असे आवाहनही केले. शक्य झाल्यास पुढील काही दिवस आरओचे पाणी प्यावे. असेही नागरिकांना सांगण्यात आले. ग्रामपंचायतची मार्फत पाणी नमुना तपासणीसाठी आरोग्य प्रयोगशाळेत पाठवण्यात आलेले आहे. सदर तपासणी मध्ये जर पाणी पिण्यायोग्य नसल्याचे आढळले तर पाटबंधारे विभाग कडून भरलेले तळे पुना रिकामे करून घेण्यात येईल .असेही यावेळी सांगण्यात आले. तसेच नागरिकांच्या हक्कासाठी मळी मिश्रित पाणी येणार नाही याची काळजी पाटबंधारे विभागाने घेतली नाही तर या विरोधातही आंदोलन करण्यात येईल. असा इशारा संजय गुरसळ यांनी दिला. प्रशासनाच्या वतीने आरोग्य सेवक शिंदे यांनी संजय गुरसळ, दादाभाई सय्यद ,देवा पवार, दिगंबर पवार ,बाळासाहेब गुरसळ, ग्रामसेवक भाऊसाहेब पाडेकर , पाणी पुरवठा कर्मचारी यांच्या समक्ष पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेतले आहेत. पाणी तपासणीनंतर पाणी पिण्यायोग्य आहे की नाही हे उद्या समजणार आहे.
नाशिक पाट बंधारे विभागाने हे मळी मिश्रित पाणी कुठून येते, पाणी कालव्यात कोण सोडते याचा तपास करून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी. पाणी म्हणजे जीवन आहे आणि हेच पाणी अशुद्ध असले तर नागरिकांचे आरोग्य धोक्यात येणार आहे. कोपरगाव तालुक्यात महाराष्ट्र शासनाच्या अनेक पाणी योजना आहेत. या सर्व पाणी योजनेतील तळ्यांना हेच पाणी येत असल्याने आता आवाज कोणी उठवायचा असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.जर डाऊच खुर्द ग्रामपंचायतच्या नवीन तळ्यातील पाण्याचे नमुने पाणी पिण्यायोग्य असल्याचे निश्चित झाले नाही तर पाटबंधारे विभागाकडून हे तळे खाली करून घेणार व पुन्हा नैसर्गिक असलेले पाणी भरून घेणार असल्याचेही गुरसळ यांनी सांगितले.