स्व. करमसीभाई सोमैया यांनी समाजसेवेचा दिलेला वारसा आपल्याला पुढे घेऊन जायचा आहे : सुहास गोडगे कोपरगाव(प्रतिनिधी) – महाराष्ट्रातील साखर उद्योगाचे जनक, गोदावरी बायोरिफायनरीजचे संस्थापक, सोमैया विद्याविहार मुंबई, गिरी वनवासी व अनेक सामाजिक संस्थेचे संस्थापक उद्योग महर्षी, शिक्षण प्रेमी,थोर समाजसेवक पद्मभुषण स्व. करमसीभाई जेठाभाई सोमैया यांची १२१ वी जयंती मंगळवार दिनांक १६ मे २०२३ रोजी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी गोदावरी बायोरिफायनरीज लि. साकरवाडीचे डायरेक्टर(वर्क्स) सुहास गोडगे व जनरल मॅनेजर प्रवीण विभूते यांच्या मार्गदर्शनाखाली गोदावरी बायोरिफायनरीज लि. साकरवाडी या कारखाना स्थळावर भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या शिबिरामध्ये ६७ दात्यांनी रक्तदान केले. रक्तदान शिबिराचे उद्घाटन गोदावरी बायोरिफायनरीज लि. साकरवाडी चे डायरेक्टर(वर्क्स) सुहास गोडगे व जनरल मॅनेजर प्रवीण विभूते यांनी केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष वैद्यकीय अधिकारी डॉ. दरंदले होते. स्व. करमसीभाई सोमैया यांनी समाजसेवेचा दिलेला वारसा आपल्याला पुढे घेऊन जायचा आहे. जयंतीनिमित्त रक्तदान शिबीर आयोजन करण्याचा सामाजिक बांधिलकी जोपासणारा हा स्तुत्य उपक्रम आहे असे प्रतिपादन सुहास गोडगे यांनी केले. रक्तदान ही काळाची गरज आहे, रुग्णालयांमध्ये रक्ताचा साठा नेहमी कमी असल्याचे दिसून येते. रुग्णांना वेळेवर रक्ताचा पुरवठा होत नाही त्यामुळे कित्येक रुग्णांना आपला जीव गमवावा लागतो. म्हणून जास्तीत जास्त कर्मचाऱ्यांनी रक्तदान करावे असे आवाहन आपल्या अध्यक्षीय भाषणात डॉ. दरंदले यांनी केले.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी कामगार अधिकारी संजय कऱ्हाळे, राजू सोनवणे, महेंद्र पाटील, सर्व अधिकारी व कामगार बंधूंनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्र संचलन तसेच आभार जनसंपर्क अधिकारी गणेश पाटील यांनी मानले.