संगमनेर : तालुक्यातील मालदाड ग्रामपंचायत कार्यालयाला टाळे ठोकणाऱ्या आणि त्यासाठी प्रवृत्त करणाऱ्या व्यक्तींवर कायदेशीर कारवाई करावी या मागणीसाठी सरपंचासहित मालदाड गावातील ग्रामंस्थानी संगमनेर पंचायत समितीवर मोर्चा नेला. ग्रामपंचायतीला टाळे ठोकल्यामुळे ग्रामपंचायतीचा कारभार ठप्प झाला असून गावात विकासात्मक कामांमध्ये खोडा घालणाऱ्या व्यक्तींवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी संतप्त ग्रामस्थांनी यावेळी केली.
मालदाड येथील संबधीत संस्था चालक त्याचे पाप झाकणासाठी गावातील नागरिकांना पुढे करत असल्याचा आरोपही यावेळी मालदाड ग्रामस्थांनी केला. पंधरा वर्ष त्यांच्या ताब्यात ग्रामपंचायत होती त्यावेळी त्यांना साधा रस्ताही करता आला नाही असा आरोप ही ग्रामस्थांनी केला. यावेळी सरपंच गोरक्षनाथ नवले यांनीही आपली भूमिका स्पष्ट केली. विरोधकांनी असलेल्या प्रश्नांवर समोरासमोर येऊन चर्चा करावी असे खुले आव्हान सरपंचांनी यावेळी दिले. आपल्या मागणीचे निवेदन यावेळी विस्ताराधिकारी माळी यांना यावेळी ग्रामस्थांनी दिले व या संपूर्ण प्रकाराची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी केली. तसेच ग्रामपंचायत कार्यालयाला टाळे ठोकणाऱ्या व्यक्तींवर कारवाई न झाल्यास संगमनेर पंचायत समिती समोर उपोषण करू असा इशाराही सरपंच गोरक्ष नवले यांनी दिला आहे.यावेळी बाबासाहेब नवले, बाळासाहेब नवले, प्रकाश सोनवणे, रवींद्र नवले, विलास नवले, सुरेश नवले, प्रकाश नवले, शंकर गिरी सह ग्रांमस्थ सहभागी झाले होते.