पावसाअभावी पेरण्यांना फटका
पोहेगांव :
चांदेकसारे परिसरात पावसाने पाठ फिरवल्याने शेतकरी चिंतातूर झाला आहे. गेल्या दोन दिवसांपासून पावसासाठी अपेक्षित वातावरण तयार झालेले नाही. त्यामुळे मॉन्सून सुरू होऊनही हवामान विभागाने दिलेली वेळ टळून गेली आहे. दिवसभर आकाश निरभ्र राहिल्याने उन्हाचा तडाखा जाणवत आहे. दरम्यान जून जुलै २०२३ मध्ये झालेल्या पावसा प्रमाणेच यावर्षी म्हणजेच जून जुलै २०२४ मध्येही या भागात पावसाची नोंद झाली नाही. कोपरगाव तालुक्यात
इतर ठिकाणीही पावसाने ओढ दिली आहे. मॉन्सूनच्या प्रतीक्षेत असणाऱ्या बळीराजाला दिलासा मिळेल, असा पाऊस होत नाही. गेल्या काही दिवसांत पावसाचे प्रमाण कमी असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. कोपरगाव तालुक्यातील कृषी विभागाच्या अंदाजानुसार तालुक्यात 60 ते 70 टक्के पेरणी झाली आहे. मात्र आता पेरणी झाल्यानंतर पावसाची प्रतीक्षा सुरू आहे. तर चांदेकसारे डाऊच खुर्द हिंगणी परिसरात अजूनही शेतात पेरणी झालेली नाही.
वातावरणात आता बदल झाला असून कधी ऊन तर कधी ढगाळ वातावरण होत आहे. तालुक्यात काही ठिकाणी खरिपाची पेरणी अंतिम टप्प्यात आली आहे. महिन्यापासून पेरण्या सुरू आहेत. यासाठी जोरदार पावसाची गरज आहे. जेवढा पाऊस होईल तेवढी पिकांना उभारी मिळणार आहे. पिकांना पाण्याची गरज भासत आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षीही जून जुलै महिन्यादरम्यान पावसाचे प्रमाण चांगले राहिले नाही.