चांद्रयान-३’ मोहीम यशस्वी झाल्याने भारतासाठी आजचा दिवस ऐतिहासिक व अभिमानास्पद -स्नेहलताताई कोल्हे 

0

कोपरगावात संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या वतीने फटाक्यांची आतषबाजी करून आनंदोत्सव साजरा

कोपरगाव : भारताने बुधवारी संध्याकाळी ‘चांद्रयान-३’ चे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीरीत्या सॉफ्ट लँडिंग करून जगात नवा इतिहास रचला आहे. आजचा दिवस संपूर्ण भारतासाठी ऐतिहासिक, गौरवास्पद व अभिमानास्पद व अविस्मरणीय दिवस आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समर्थ नेतृत्वाखाली भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) ‘चांद्रयान-३’ चे यशस्वी लँडिंग करून अवकाश तंत्रज्ञान क्षेत्रात गरुडझेप घेतली असून, भारताच्या अवकाशातील या कामगिरीची जगाच्या इतिहासात गौरवाने नोंद होईल, अशा शब्दांत कोपरगाव विधानसभा मतदारसंघाच्या माजी आमदार तथा भाजप नेत्या स्नेहलताताई कोल्हे यांनी आनंद व्यक्त केला आहे. कठोर मेहनत घेऊन ही आव्हानात्मक कामगिरी यशस्वी केल्याबद्दल ‘इस्रो’ च्या सर्व वैज्ञानिकांचे स्नेहलताताई कोल्हे यांनी अभिनंदन करून त्यांना धन्यवाद दिले आहेत.

भारताची ‘चांद्रयान-३’ मोहीम यशस्वी झाल्यानंतर संजीवनी युवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष युवा नेते विवेकभैय्या कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरगाव येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदानावर संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या वतीने बुधवारी (२३ ऑगस्ट) संध्याकाळी ‘चांद्रयान-३’ मोहिमेचे लाईव्ह प्रक्षेपण करण्यात आले. यावेळी संजीवनी युवा प्रतिष्ठानचे युवा सेवक, भाजप, भाजयुमो, विविध संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, शालेय विद्यार्थी व नागरिकांनी हातात तिरंगा ध्वज घेऊन ‘भारतमाता की जय,’ ‘वंदे मातरम्’ च्या घोषणा देत पेढे वाटून, फटाक्यांची जोरदार आतषबाजी करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

स्नेहलताताई कोल्हे म्हणाल्या, चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर चांद्रयानाचे यशस्वी लँडिंग करणारा भारत हा पहिलाच देश असून, चंद्रावर यानाची यशस्वीरीत्या सॉफ्ट लँडिंग करणारा भारत हा चौथा देश बनला आहे. विकसित भारतासाठी आजचा हा क्षण ऐतिहासिक, महत्त्वाचा व भारतासाठी नवी चेतना देणारा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समर्थ नेतृत्वाखाली भारताची सर्व क्षेत्रात वेगाने प्रगती होत असून, भारताची जागतिक महासत्तेकडे घोडदौड सुरू आहे. त्यात आज भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात ‘इस्रो’ने ‘चांद्रयान-३’ चे यशस्वी लँडिंग करून ऐतिहासिक कामगिरी बजावली आहे. भारताच्या ‘चांद्रयान-३’ मोहिमेकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले होते. आज २३ ऑगस्ट रोजी संध्याकाळी ६ वाजून ४ मिनिटांनी चांद्रयानाच्या विक्रम लँडरचे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीपणे सॉफ्ट लँडिंग झाले आहे. ‘चांद्रयान-३’ सुरक्षितपणे चंद्रावर उतरावे आणि ही मोहीम यशस्वी व्हावी यासाठी मी शिर्डीच्या श्री साईबाबांचे दर्शन घेऊन विशेष प्रार्थना केली होती. अखेर आज ‘चांद्रयान-३’ चे चंद्रावर यशस्वीपणे लँडिंग झाल्यामुळे मला अत्यानंद झाला आहे. ‘चांद्रयान-३’ मोहिमेत अहमदनगर जिल्ह्याचे सुपुत्र व ‘इस्रो’मध्ये कार्यरत वैज्ञानिक मयुरेश शेटे यांचा सक्रिय सहभाग असून, महाराष्ट्रातील राजुरी येथील आसिफ महालदार यांच्या कंपनीकडे या मोहिमेच्या संरक्षणाची जबाबदारी आहे. ही आपल्या सर्वांसाठी अतिशय अभिमानाची बाब आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here