छत्रपती संभाजीनगर : छ. संभाजीनगरमध्ये हिंसा घडवणाऱ्या आरोपींच्या शोधासाठी पोलिसांच्या ८ टीम तयार करण्यात आल्या असून सी सी टीव्ही फुटेजच्या माध्यमातून लवकरच आरोपींच्या मुसक्या आवळण्यात येतील.तसेच हिंसाचारप्रकरणी एफआयआर दाखल करण्याची प्रक्रिया जवळपास पूर्ण झाली आहे, अशी माहिती पोलीस आयुक्त निखील गुप्ता यांनी दिली. छत्रपती संभाजीनगरमध्ये राम नवमी कार्यक्रमाच्या आयोजनाची तयारी सुरू असताना दोन गटांमध्ये झालेल्या वादातून जाळपोळ आणि दगडफेकीचा प्रकार समोर आला आहे. यादरम्यान, परिसरातील वाहनांची जाळपोळ करण्यात आली. त्यामध्ये पोलिसांच्या वाहनांचाही समावेश आहे.
सध्या येथील परिस्थिती नियंत्रणात असली तरी वातावरणातील तणाव मात्र कायम आहे. कडेकोट पोलीस बंदोबस्तात राम नवमीच्या कार्यक्रमांचं आयोजन सध्या करण्यात येत आहे.
तसंच, “या हिंसाचारातील आरोपींचा शोध घेण्यासाठी आम्ही 8 टीम तयार केल्या आहेत, ज्या हल्लेखोरांना अटक करतील. त्यानंतर पुढची कायदेशीर कारवाई सुरु आहे,” अशीही माहिती पोलीस आयुक्त निखील गुप्तांनी सांगितली.
दंगलीला MIM आणि भाजप जबाबदार’ – अंबादास दावने
विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांनी याप्रकरणी भाजप आणि एमआयएमवर आरोप केले आहेत. तसंच संभाजीनगरच्या पोलीस आयुक्तांवर देखील त्यांनी आरोप केले आहेत.
“संभाजीनगरात बुधवारी रात्री घडलेली घटना म्हणजे मागच्या दीड महिन्यापासून हिंदू आणि मुस्लिम बांधवांमध्ये भांडणं लावण्याचा जो प्रकार सातत्याने 2 गटांकडून सुरू आहे. त्यात एमआयएम, भाजप आणि शिवसेनेतून गेलेल्या गद्दारांचा सामावेश आहे.
यादोन्ही गटांनी सातत्याने हिंदू आणि मुस्लिमांमध्ये सातत्याने भेद निर्माण करण्याचा प्रयत्न केला. ‘दंगल होणार’ अशा प्रकारचं वक्तव्य मागच्या महिनाभरापासून लोक करत होते. मीसुद्धा याबाबत प्रशासनाला आणि पोलीस आयुक्तांना चारदा बोललो. परंतू मला वाटतं याची दखल घेतली गेली नाही,” असं दानवे यांनी म्हटलंय.
तसंच “जातीय द्वेष स्वतःच्या राजकीय पोळ्या भाजण्यासाठी पसरवले जात आहेत. पोलीस आयुक्त याबाबत सुस्पष्ट आणि रोखठोख भूमिका घेण्यात कमी पडले आहेत. या दंगलीला एमआयएम, भाजप आणि त्यांचे मित्र जबाबदार असल्याचं मी जाणिपूर्वक सांगत आहे,” असा आरोप त्यांनी केला आहे.