देवळाली प्रवरा /प्रतिनिधी
सुरत हैदराबाद या एक्सप्रेस ग्रीन हायवे साठी जमीन मोजणी करण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांना प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी विरोध केला. आमच्याशी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चर्चा केल्याशिवाय मोजणी होऊ दिली जाणार नाही असा इशारा आंदोलन शेतकऱ्यांनी दिला .
तालुक्यातील काही गावांमध्ये सुरत हैदराबादची एक्सप्रेस ग्रीन हायवे ची मोजणी सुरू झाली असली तरी खडांबा सडे परिसरात शेतकरी विरोध करीत आहेत .आज संपादित जमिनीची मोजणी करण्यासाठी मंडलाधिकारी दत्ता गोसावी ,कामगार तलाठी कदम आलेले होते .भूसंपादन करावयाच्या शेतकऱ्यांना याबाबतच्या नोटिसा महसूल विभागांने बजावलेल्या होत्या. त्यानुसार दीडशे ते दोनशे शेतकरी खडांबे येथे हजर होते .
आंदोलकांसमोर बाबासाहेब धोंडे म्हणाले की या परिसरातील शेतकऱ्यांनी महात्मा फुले कृषी विद्यापीठासाठी जमिनी दिलेल्या आहेत. तसेच मुळा धरण ,इंडियन ऑइल प्रकल्प यासाठी देखील शेतकऱ्यांनी जमिनी दिलेल्या आहेत .प्रकल्प ग्रस्तांच्या संपूर्ण पुर्नवसन बाबतीत अनेक परीपत्रके निघाली. मात्र पूणे पणे अंमलबजावणी झाली नाही.आमच्या जमिनीचा प्रत्यक्ष मोबदला आम्हाला किती मिळणार हे स्पष्ट सांगितल्याशिवाय आम्ही जमीन मोजणी होऊ देणार नाही .याबाबत वरिष्ठ अधिकारी व प्रकल्पग्रस्त शेतकरी यांची एकत्रित बैठक शासकीय कार्यालयात घेतली जावी. खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी मुळा प्रवरा वीज सहकारी संस्थेच्या कार्यालयात बैठक घेतली. तसे न करता शासकीय कार्यालयात बैठक घ्यावी. प्रकल्पग्रस्तांच्या शंकांचे पूर्ण निरसन केले जावे. आज पर्यंत आठ प्रकल्पग्रस्तांसाठी प्रकल्पांसाठी आपण जमिनी दिले आहेत असे बाबासाहेब धोंडे यांनी सांगितले तर दौलतराव पवार यांनी विद्यापीठासाठी 76 एकर जमीन संपादित केली गेली व एका दिवसात आपण भूमिहीन झाल्याचे सांगितले .स्पॉट पंचनामे करून नुकसान भरपाई मिळाली पाहिजे व योग्य मोबदला मिळाल्याशिवाय शेतकरी जमिनी देणार नाहीत .शेतकरी मोजणी होऊ देणार नाहीत असा इशारा आंदोलकांनी दिला. त्याशिवाय गोरख धोंडे ,सुनील धोंडे ,दगडू पवार, सुरेश धोंडे, सुरेश ताकटे ,संजय ताकटे ,अरविंद ताकटे आदींनी अधिकाऱ्यांशी चर्चेत भाग घेतला . पाच तासाच्या चर्चेनंतर प्रकल्पग्रस्तांचा विरोध पाहून मंडल अधिकारी यांनी मोजणी स्थगित केली .याबाबतचा अहवाल आपण वरिष्ठांना पाठवू असे त्यांनी सांगितले. आंदोलक शेतकऱ्यांच्या हरकतीचे लेखी पंचनामे करून चार वाजता मंडळ अधिकारी यांनी मोजणी स्थगित केली.