श्रीनगर: देशाच्या विविध भागात थंडीचा जोर (Cold Weather) वाढला आहे. वाढत्या थंडीमुळे अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले आहे. विशेषत: उत्तर भारतात थंडीचा जोर वाढला आहे. जम्मू काश्मीरमध्ये तर तापमानाचा पारा उणेमध्ये गेला आहे. लडाखमध्येउणे 29.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. त्याठिकाणी नदी नाले गोठले आहेत. त्याचा विपरीत परिणाम होत असल्याचे दिसत आहे. पाणी गोठल्याने माणसांसह प्राण्यांनाही मोठ्या प्रमाणात अडचणींचा सामना करावा लागत आहे.
कुठे किती तापमानाची नोंद?
लडाखमध्ये कडाक्याच्या थंडीनंतर धोकादायक स्थिती बनली आहे. एकीकडे बर्फवृष्टी आणि दुसरीकडे काडाक्याची थंडी यामुळे मन हेलावून टाकणारे दृश्ये पाहायला मिळत आहेत. तर दुसरीकडे पाणी गोठल्याने माणसांसह प्राण्यांनाही मोठ्या प्रमाणात अडचणींचा सामना करावा लागत आहे. लडाखमध्ये उणे 29.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. तर कारगिलमध्ये उणे 20.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. तसेच लेहमध्ये किमान तापमान उणे 15.6 अंश सेल्सिअसवर घसरले आहे.
पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईन गोठल्या
सध्या कारगिलसह लेह लडाखमधील इतर भागातील रस्त्यांची अवस्थाही तशीच आहे. सर्वत्र रस्त्यांवर बर्फाची चादर पसरली आहे. त्यामुळे वाहतुकीलाही मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण होत आहे. या कडाक्याच्या थंडीमुळे पिण्याच्या पाण्याच्या सर्व पाईपलाईन गोठल्या आहेत. त्यामुळे लोकांना आता विहिरीतून पाणी भरावे लागत असल्याची स्थिती आहे. जिथे पाण्याचे पाईप अद्याप गोठलेले नाहीत, तिथे पाणी गोठू नये म्हणून नळ काढून टाकण्यात आले आहेत. जेणेकरुन पाणी सतत वाहत राहावे.
नदी नाल्यांमध्ये पूर्णपणे बर्फ, बाजारपेठा रिकाम्या
थंडी एवढी तीव्र आहे की नदी नाले पूर्णपणे बर्फाचे बनले आहेत. ज्या नदी-नाल्यांमध्ये भरपूर पाणी वाहत आहे, तिथे बर्फाच्या रुपात पाणी वाहत आहे. थंडीमुळे लडाख आणि कारगिलच्या बाजारपेठा रिकाम्या पडल्या आहेत. बाजारात फार कमी लोक येत आहेत.