जामखेड तालुका प्रतिनिधी : जामखेड येथील प्रसिद्ध कवी, लेखक व मराठी साहित्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा.आ.य. पवार वय ७८ यांचे दि. सोमवार दि.३० रोजी सायंकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. प्रा.आ.य.पवार यांच्या विज्ञान कविता व काव्यसंग्रह राज्य व राज्याबाहेरील विविध विद्यापीठामध्ये पदवी अभ्यासक्रमात आहेत. मराठा आंदोलनातील प्रमुख अवधूत पवार यांचे ते वडील होते.
प्रा.आ.य.पवार हे एक जेष्ठ व दर्जेदार कवी व साहित्यिक होते. त्यांच्या विज्ञान कविता नांदेड, नागपूर, अमरावती व मुंबई विद्यापीठाच्या पदवी अभ्यासक्रमात आहेत. आ.य.पवारांच्या विज्ञान कविता ‘ या विषयावर मुंबई विद्यापीठांतर्गत लक्ष्मी शालिनी महाविद्यालय पेझारी (अलिबाग) येथे दि.७ मार्च २०२२ रोजी राज्यस्तरीय चार्चासत्र झालेले आहे. तसेच ‘ आ.य.पवारांच्या निसर्ग व विज्ञान कविता’ या विषयावर ५ मे २०२२ रोजी नांदेड विद्यापीठांतर्गत लातूर येथील व्यंकटराव देशमुख महाविद्यालयात राष्ट्रीय चार्चासत्र झालेले आहे. या चर्चा सत्राचा २७५ पानी ग्रंथ प्रसिध्द झालेला आहे.
अत्ता पर्यंत पवार यांनी लिहिलेल्या प्रसिध्द साहित्यामध्ये करकुंजाचा थवा (बाल साहित्य), आंब्यावरचा राघू (कथासंग्रह), सीनाकाठच्या कविता (काव्यसंग्रह) यांची तिसरी आवृती, तसेच ऊनपाऊस व धूळपेर (काव्यसंग्रह) यांची प्रथम आवृत्ती तर अगामी कर्मयोगी संपादित आशा साहित्यांचा समावेश आहे.
तसेच त्यांचा ‘धूळपेर’ काव्यसंग्रह कर्नाटक विद्यापीठाच्या तृतीय वर्ष पदवी अभ्यासक्रमाला शंभर गुणासाठी आहे. ‘धूळपेर’ काव्य संग्रहाला कुलगुरू व ज्येष्ठ साहित्यिक डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांची प्रस्तावना आहे. शेतकरी जीवन, महिला जीवन, सामाजिक, राजकिय व विज्ञान आणि निसर्ग विषयावरील कविता असल्याने हा काव्य संग्रह सामीक्षकांनी गौरविलेला आहे.
पवारांची कविता स्वतंत्र वळणाची व छंदोबद्ध आहेत. जामखेड येथे मराठी साहित्य प्रतिष्ठानचे ते अध्यक्ष होते. प्रतिष्ठानच्या माध्यमातून गेली अनेक वर्षापासून कवी संमेलन, साहित्य संमेलन व समाजात विविध क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या व्यक्तींना ते प्रतिष्ठानच्या माध्यमातून पुरस्कार देऊन गौरवित होते. तसेच साहित्य क्षेत्रातील विविध कार्यक्रम घेण्यात ते नेहमी आघाडीवर होते
प्रा.आ.य.पवार हे रयत शिक्षण संस्थेत मराठी विषयात प्राध्यापक म्हणून ३० वर्षे सेवा केली व नंतरचे सेवानिवृत्त झाले होते. प्रा.आ.य.पवार हे काही दिवसांपासून आजारी होते. आज सोमवार दि. ३० डिसेंबर रोजी सायंकाळी त्यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, एक मुलगा दोन मुली (विवाहित), सुन, नातवंडे असा परिवार आहे.