जिल्हा विभाजनाबाबत सत्ताधारी आणि विरोधकांनी  आपली भूमिका स्पष्ट करावी – डॉ.भानुदास डेरे      

0

संगमनेर : अहमदनगर जिल्हा विभाजनाचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून रेंगाळला आहे. जिल्हा विभाजन होणे गरजेचे असल्याने   जिल्ह्यातील सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या नेत्यांनी याबाबत आपली भूमिका जनतेसमोर स्पष्ट करावी असे आवाहन ज्येष्ठ नेते व भारतीय जनता पक्षाचे माजी तालुकाध्यक्ष  डॉ. भानुदास  डेरे यांनी केले आहे. जिल्हा विभाजनाचा प्रश्न मार्गी लावण्याबरोबरच संगमनेर येथील शासकीय औद्योगिक वसाहतीचा प्रश्नही  सोडवावा असे आवाहन त्यांनी केले.                                        संगमनेर येथे पत्रकारांशी बोलताना त्यांनी जिल्हा विभाजनाच्या प्रश्नाबाबत आपली भूमिका मांडली. ते पुढे म्हणाले ,अहमदनगर जिल्हा हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने राज्यातील सर्वात मोठा जिल्हा आहे. अहमदनगर जिल्ह्याच्या ठिकाणापासून संगमनेर व अकोले तालुक्याचे अंतर शंभर किलोमीटर पेक्षा अधिक आहे. यामुळे या तालुक्यातील नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत  आहे. ही अडचण टाळण्यासाठी जिल्हा विभाजन करणे हाच अंतिम पर्याय आहे. जिल्हा विभाजन करून नवीन जिल्ह्याचे ठिकाण संगमनेर येथे करावे अशी मागणी अनेक वर्षांपासून केली जात आहे. यासाठी वेळोवेळी आंदोलने ही करण्यात आली आहेत.  संगमनेरच्या सत्ताधाऱ्यांनी ही एकेकाळी जिल्हा विभाजनासाठी आंदोलन केलेले आहे. याशिवाय विरोधी पक्षांनीही वेळोवेळी या प्रश्नासाठी आंदोलन केलेले आहे.  दिवंगत ज्येष्ठ नेते भाऊसाहेब थोरात यांचीही जिल्हा विभाजनाची भूमिका होती. माजी आमदार डॉ. सुधीर तांबे,माजी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे यांच्यासह अनेकांचा जिल्हा विभाजनाच्या मागणीला पाठिंबा होता.  दोन वर्षांपूर्वी संगमनेर येथे जिल्ह्याच्या मागणीसाठी  आंदोलन झाले. संगमनेर बस स्थानकावर झालेल्या या आंदोलनाला विद्यमान महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी भेट देऊन पाठिंबा दिला होता. जिल्हा विभाजन व्हावे असे सर्वांनाच वाटत असताना हा प्रश्न मार्गी का लागत नाही असा सवाल डॉ. डेरे यांनी केला आहे.             

             संगमनेरचे लोकप्रतिनिधी आघाडी सरकारमध्ये महसूल मंत्री होते. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत त्यांचे घनिष्ठ संबंध होते, एका सहीवर ते जिल्हा विभाजन करू शकत होते. मात्र त्यांनी याबाबत निर्णय घेतला नाही. विद्यमान महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचाही जिल्हा विभाजनाला पाठिंबा आहे. त्यांनी तरी आता जिल्हा विभाजनाचा प्रश्न मार्गी लावावा. जिल्ह्यातील सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या नेत्यांनी जिल्हा विभाजनाबाबत आपली भूमिका जनतेपुढे स्पष्ट करावी असे आवाहन त्यांनी केले.संगमनेर तालुका हा विकासाकडे वाटचाल करीत आहे. या तालुक्यात अद्याप एमआयडीसी नाही. एमआयडीसी नसल्याने तालुक्यात  नवीन मोठे उद्योग येणे अवघड होत आहे. एमआयडीसी मंजूर झाल्यास तालुक्यात वेगवेगळे उद्योग सुरू होतील व यातून हजारो युवकांना रोजगार उपलब्ध होईल. यामुळे संगमनेर तालुक्यात त्वरित एमआयडीसी सुरू करावी अशी मागणीही डॉ. भानुदास डेरे यांनी करून तालुक्यातील युवकांना बेरोजगार ठेवण्याचे पाप कोणी करू नये असे आवाहन त्यांनी केले.           

अन्यथा संगमनेेर, अकोले तालुका नाशिकला जोडावेत..!        

जिल्हा विभाजन होत नसल्याने संगमनेर व अकोले तालुक्यातील नागरिकांची मोठी अडचण होत आहे.  या तालुक्यापासून अहमदनगरचे अंतर मोठेे आहे. तुलनेमध्ये नगरपेक्षा नाशिकचे अंतर जवळ आहे. जिल्हा विभाजन होत नसेल तर संगमनेर व अकोले या दोन्ही्ही तालुक्यांना नाशिक जिल्ह्याला जोडावे. असे झाल्यास या दोन्ही तालुक्यातील नागरिकांना मोठा दिलासा मिळेल असे डॉ. डेरे यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here