झगडे फाटा-पोहेगाव रस्त्यादरम्यान खड्डे चुकविण्यापेक्षा मार्ग बदललेला बरा !

0

चाळण झालेल्या रस्त्याने स्थानिक ग्रामस्थ हैराण.. लोकप्रतिनिधींनी लक्ष घालण्याची गरज 

कोपरगाव प्रतिनिधी :

कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव परिसरात राहणाऱ्या नागरिकांना कोपरगाव येथे जाण्यासाठी सध्या मोठा सामना करावा लागत आहे. झगडेफाटा ते रांजणगाव देशमुख रस्त्याची परिस्थिती काही सांगायला नको. त्यातल्या त्यात झगडे फाटा ते पोहेगाव पर्यंत या रस्त्याने प्रवास करणे म्हणजे हात दाखवून अवलक्षण करण्यासारखे आहे. या रस्त्याच्या दुर्दशेमुळे नागरिक मात्र पुरते हैराण झाले आहे. लोकप्रतिनिधी आमदार अशुतोष काळे व खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी  या सदर्भात लक्ष घालण्याची गरज निर्माण झाली आहे. या रस्त्याचे खड्डे चुकवण्यापेक्षा पोहेगाव परिसरातील नागरिकांनी सोनेवाडी चांदेकसारे मार्गे कोपरगाव किंवा पोहेगाव देर्डे कोऱ्हाळे मार्गे कोपरगाव असा प्रवास सुरू केला आहे. 

झगडे फाटा ते पोहेगाव या तीन किलोमीटर अंतरावर सरपंच किरण होन यांची वस्ती ते पोहेगांव या दरम्यान अत्यंत मोठमोठे खड्डे या रस्त्यावर पडलेले आहेत. दोनदा या रस्त्याच्या कामासाठी निधी उपलब्ध झाला. ठेकेदाराकडून या रस्त्याचे कामही करण्यात आले. मात्र कामाचा दर्जा व ठेवण नसल्याने या रस्त्यांची अवस्था पुन्हा येरे माझ्या मागल्या अशी झाली आहे.या रस्त्यात प्रचंड मोठमोठे खड्डे पडले असून श्री मयुरेश्वर देवस्थानच्या दर्शनासाठी देखील भाविकांना अनेक संकटांचा सामना करावा लागतो.

कोपरगाव येथे शासकीय कामासाठी पोहेगाव पंचक्रोशीतील नागरिक वरील पर्यायी रस्त्यांचा वापर करतात. या रस्त्या संदर्भात अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. रस्त्यावर भाकरी भाजल्या, कंदील लावून रस्त्यात वाट शोधली मात्र तरी देखील प्रशासनाच्या बाजूने कुठलीच दखल घेतली नाही हे मोठे दुर्दैवी आहे. आता या रस्त्याच्या बाबतीत लोकप्रतिनिधींनीच लक्ष घालून पोहेगाव पंचक्रोशीतील नागरिकांचा त्रास कमी करावा अशी मागणी होत आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here