सरपंच, ग्रामविकास अधिकारी, काही सदस्यांनी ग्रामसभा सोडली
देवळाली प्रवरा /प्रतिनिधी
राहुरी तालुक्यातील टाकळीमिया ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत मागिल इतिवृत्त वाचल्यानंतर 15 व्या वित्तआयोगाच्या निधीच्या खर्चावर नंदकुमार जुंदरे यांनी आक्षेप घेतल्याने ग्रामसभेच्या अध्यक्षा व सरपंच लिलाबाई गायकवाड त्यांचे राजेंद्र गायकवाड व मुलगा यांनी ग्रामस्थांबरोबर वाद घालुन नको ती भाषा वापरुन सरपंचासह काही सदस्यांनी ग्रामसभा सोडुन गेल्याने ग्रामस्थांनी प्रतिकात्मक ग्रामसभा घेवून सत्ताधारी ग्रामपंचायत सदस्यासह ग्रामसेवकांचा निषेध केला.
ग्रामसभा सुरु झाल्या नंतर मागिल ग्रामसभेचे इतिवृत्त वाचुन कायम करणे हा विषय मांडण्यात आला.या इतिवृत्तातील 15 व्या वित्तआयोगाच्या निधीच्या खर्चावर नंदकुमार जुंदरे यांनी आक्षेप घेतला.गावासाठी फिरत्या शौचालयासाठी सुमारे आठ लाख आठ हजार रुपये खर्च करण्यात आले.परंतु आजपर्यंत गावात ते शौचालय दिसतनाही.अस्तित्वात नसलेल्या शौचालयावर एवढा खर्च केला आहे.ग्रामविकास अधिकारी व पदाधिकारी यांनी अपहार झाला असल्याचे ग्रामसभेपुढे जाहिर करावे अशी जुंदरे यांनी मागणी करताच ग्रामसभेच्या अध्यक्षा तथा सरपंच लीलाबाई गायकवाड व त्यांचे पती राजेंद्र गायकवाड यांनी झालेल्या कामाबद्दल बोला उगाच चुकीचे आरोप करू नका,अशी आक्रमक भूमिका घेतल्याने ग्रामसभेत एकच गदारोळ झाला.यातून चांगलीच बाचाबाची झाली.यावेळी सुभाष करपे यांनी ग्रामपंचायत सदस्यांना काही किंमत आहे की नाही.नाहीतर आम्ही राजीनामे देण्यास तयार आहे.असे सांगितल्याने गदारोळ आणखीनच वाढला.या गदारोळातच सरपंच लिलाबाई गायकवाड,ग्रामविकास अधिकारी बी.जी.निमसे व काही सदस्य ग्रामसभा सोडून निघून गेले.
ग्रामस्थांनी त्याच ठिकाणी प्रतिकात्मक सभा पुढे चालू ठेवली. या प्रतिकात्मक ग्रामसभेचे अध्यक्ष अँड. रावसाहेब करपे यांची नियुक्ती करण्यात आली. या प्रतिकात्मक सभेत काही ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. तर ग्रामसभेसाठी पंचायत समितीचे अधिकारी, इंजिनिअर,अंगणवाडी सेविका व इतर खात्यांचे शासकीय अधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रतिकात्मक ग्रामसभेसत नंदकिशोर जुंदरे,ॲड रावसाहेब करपे,प्रताप जाधव,गणेश तोडमल आदी चर्चेत सहभागी झाले. ग्रामसभेस सरपंच लिलाबाई गायकवाड, गटविकास अधिकारी मुंढे,सदस्य सुभाष करपे,शिवशंकर करपे, ज्ञानदेव निमसे,रविंद्र मोरे,सुभाष जुंदरे, ग्रामविकास अधिकारी बी.जी.निमसे आदी उपस्थित होते.