पोहेगांव प्रतिनिधी :- हिंदुहृदयसम्राट मा. बाळासाहेब ठाकरे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात जागतिक महिला दिनानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाची सुरूवात प्रतिमा पूजनाने झाली. व्यासपीठावर महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.डॉ.जावळे एस.आर , प्रमुख पाहुणे प्रा.गांधिले बी.एस तसेच प्रा.रोहमारे के.बी उपस्थित होते. एकोणिसाव्या शतकात स्त्रीवादी चळवळीने घडून आलेले बदल स्त्रीला बंधनातून मुक्त करण्यासाठी कारक ठरले, पण आजच्या काळात पुरूष स्त्रीसाठी निंदक होण्यापेक्षा प्रेरक झाला तर परिवर्तनासाठी कोणत्याही चळवळीची आवश्यकता भासणार नाही असे प्रतिपादन प्रा. गांधिले बी. एस यांनी केले.

महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.डॉ. जावळे एस.आर यांनी स्त्री स्वातंत्र्यता गरजेची आहेच पण त्यापेक्षाही ती सुरक्षित असणे गरजेचे आहे असे व्यक्तव्य करत कर्तृत्ववान स्त्रियांच्या कार्याला उजाळा दिला. कु. रहाणे समिक्षा हिने मनोगत व्यक्त केले. वक्तृत्व, निबंध, वादविवाद स्पर्धा तसेच सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी विद्यार्थ्यांचा सन्मानपत्र व पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमासाठी विद्यार्थी, विद्यार्थींनी, प्राध्यापक वृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी आदि उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. जोशी पी.पी यांनी केले तर आभार प्रा. रोहमारे के. बी यांनी मानले.